दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत डाव्यांचा झेंडा फडकला आहे. निवडणुकीतील चारही जागा AISA आणि SFI या लेफ्ट युनियनने जिंकल्या असून, AISA चा मोहित पांडे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नवीन अध्यक्ष होणार आहे.


 

डाव्यांची आघाडी

 

जेएनयूच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत AISA आणि SFI या डाव्या संघटनांनी युती केली होती. तर बाप्सा संघटनेकडून राहुल सोनपिंपळे अध्यक्षपदासाठी मैदानात होता.

 

राहुल सोनपिंपळेची कडवी टक्कर, अभाविपच्या पदरी निराशा

 

विशेष म्हणजे या निवडणुकीत जरी डावे जिंकले असले तरी 'बाप्सा'च्या राहुल सोनपिंपळेने कडवी टक्कर दिली. मात्र, राहुलला निसटता पराभव स्वीकारावा लागला. तर मागच्या वेळी जेएनयूत एक जागा जिंकणाऱ्या अभाविपच्या पदरी यावेळी निराशा पडली आहे. सेंट्रल पॅनेलमध्ये अभाविपला एकही जागा मिळवता आलेली नाही.

 

जेएनयूमध्ये विक्रमी मतदान

 

जेएनयू विद्यार्थी निवडणुकीत यावेळी 61 टक्के एवढं रेकॉर्डब्रेक मतदान झालं होतं. अधिक मतदान झाल्याने जेएनयूत नक्की कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. अखेर डाव्यांनी झेंडा फडकवला आहे.

 

दिल्ली विद्यापीठात अभाविपची बाजी

 

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी निवडणुकात अखिल भारतीय परिषदेनं बाजी मारली आहे. 4 पैकी 3 जागा जिंकत पुन्हा एकदा अभाविपनं विजय मिळवला. तर एक जागा काँग्रेसच्या एनएसयूआयनं पटकावली आहे. या विजयानंतर अभाविपने दिल्ली विद्यापीठाबाहेर मोठा जल्लोषही केला.