Tajinder Bagga: पंजाब पोलिसांनी शुक्रवारी भाजपचे प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांना अटक केली होती. बग्गा यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानातून  पंजाब पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काल दिवसभर नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. मात्र, अखेरीस बग्गा यांची सुटका झाली आहे. बग्गा यांनी घरी परतल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. तसेच मला दहशतवाद्यांप्रमाणे पंजाब पोलीस घेऊन गेले. मला जबरदस्तीने अटक केल्याचा आरोप तेजिंदर बग्गा यांनी केला आहे.


दरम्यान, तेजिंदर बग्गा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्वीट केले होते. बग्गा यांच्या ट्वीटमुळे समाजात तेढ निर्माण होण्याचा आरोप करत मोहालीत सायबर गुन्हे विभागात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. बग्गा हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांच्या ट्वीटवरून वादही निर्माण होतात. तेजिंदर बग्गा यांना अटक केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला होता.


पंजाब पोलिसांनी जबरदस्तीने अटक केल्याचा आरोप बग्गा यांनी केला. 40 ते 50 पोलीस कर्मचारी आले होते. त्यापैकी 10 सिव्हिलमध्ये तर काही गणवेशात होते. मला पगडी आणि चप्पल घालण्याचीही परवानगी त्यांनी  दिली नव्हती. तसेच माझ्या वडिलांनाही त्यांनी मारहाण केल्याचा आरोप बग्गा यांनी केला आहे. या लोकांनी मलाही मारहाण केली. अटकेवेळी पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती, असेही बग्गा यांनी सांगितले.


नोटीसला उत्तर देणार- बग्गा


दरम्यान स्थानिक पोलिसांना याबाबतची कोणताही माहिती नव्हती असेही बग्गा यांनी सांगितले. पंजाब पोलिसांनी अटकेपूर्वी पाच नोटिसा पाठवल्या होत्या. ज्याचे उत्तर मी दिले नाही, असे सांगितले जात आहे. पण सगळ्या नोटीसला उत्तर दिले असल्याचे त्यांनी सांगितले.


घटनाक्रम  काय होता


पंजाब पोलिसांनी शुक्रवारी भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. यानंतर, दिवसभर चाललेल्या नाट्यमय घडामोडीमध्ये, हरियाणा पोलिसांनी कुरुक्षेत्रमध्ये पंजाब पोलिसांची वाहने अडवली होती. बग्गा यांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने उचलले गेले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी बग्गाला अटक करुन त्यांच्या दिल्लीच्या घरी परत आणले होते. 


बग्गा यांना अटक केल्यानंतर आम आदमी पार्टी आणि भाजपने एकमेकांवर निशाणा साधला होता. बग्गा सोशल मीडियावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात जोरदार आवाज उठवत आहेत. 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटासाठी केजरीवाल यांच्याविरोधात ट्विट करून बग्गा यांनी आम आदमी पार्टी (आप) यांच्यावर हल्लाबोल केला होता. भाजपने पंजाब पोलिसांवर आमच्या नेत्याला 'हायजॅक' केल्याचा आरोप केला होता. तसेच आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजकीय सुडापोटी पोलिसांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. दुसरीकडे, आम आदमी पक्षाने आरोप फेटाळून लावले आहेत.  बग्गा यांना पंजाबमध्ये जातीय तणाव वाढवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असल्याचे आप ने म्हटले होते.


दिल्लीत गुन्हा दाखल, तेजिंदर यांच्या वडिलांचे आरोप काय?


बग्गा यांचे वडील प्रितपाल सिंह यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.  बग्गा यांचे वडील प्रितपाल सिंग यांनी तक्रार केली की, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास काही लोक त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या मुलाला घेऊन गेले. तसेच पंजाब पोलिसांनी मारहाण केली. तसेच तेजिंदरला अटक करताना पगडी घालू दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 10 ते 15 पंजाब पोलिस कर्मचारी माझ्या मुलाला पकडण्यासाठी जनकपुरी येथील घरात जबरदस्तीने घुसले. त्यांनी तेजिंदर यांना अटक केल्याची माहिती प्रितपाल सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील जनकपुरी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत पंजाब पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली.


पंजाब पोलीस कुरुक्षेत्रात थांबले


बग्गा यांना दिल्लीहून मोहालीला घेऊन जाणारी पंजाब पोलिसांची वाहने हरियाणातील कुरुक्षेत्र येथे थांबवण्यात आली. पंजाब पोलिसांची वाहने कुरुक्षेत्रातील पीपली पोलिस ठाण्यात नेण्यात आली. त्यानंतर पंजाब पोलिसांच्या पथकाला थांबवण्याच्या प्रश्नावर, हरियाणा पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बग्गा यांना त्यांच्या राहत्या घरातून जबरदस्तीने उचलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आपल्याला या गोष्टींची पडताळणी आणि पुन्हा तपासणी करावी लागेल. त्यानंतर, दिल्ली पोलिसांच्या पथकाने अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर कुरुक्षेत्रातील पंजाब पोलिसांच्या संरक्षणाखाली बग्गाला ताब्यात घेतले होते.


बग्गा दिल्लीला परतले


कुरुक्षेत्रातील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचे एक पथक कुरुक्षेत्रात पोहोचले. त्यांनंतर त्यांनी बग्गा यांना ताब्यात घेऊन ते  दिल्लीकडे रवाना झाले. मात्र, बग्गा यांच्या अटकेमागील कारण आणि त्यांची कायदेशीर वैधता याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पंजाब पोलिसांनी असा दावा केला की, पाच नोटिसा बजावूनही, बग्गा यांनी याबाबत काही उत्तरे दिली नव्हती. त्यानंतर कायद्याच्या प्रक्रियेनंतर त्यांना सकाळी त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती.


हे संपूर्ण प्रकरण बग्गा यांच्याशी संबंधित आहे


पंजाब पोलिसांनी गेल्या महिन्यात बग्गा विरुद्ध चिथावणीखोर विधाने करणे, शत्रुत्व वाढवणे आणि धमकी देणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मोहालीतील आप नेते सनी अहलुवालिया यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बग्गाविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता. 1 एप्रिलला  दाखल केलेल्या एफआयआरनुसार, बग्गा यांनी 30 मार्च रोजी दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप युवा मोर्चाच्या निषेधात भाग घेतला होता. त्यावेळी आक्षेपार्ह वक्तव्य देखील त्यांनी केल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले.


केजरीवाल यांची हुकूमशाही मानसिकता, भाजपचा आरोप 


बग्गा यांच्या अटकेवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भाजप नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर हुकूमशाही मानसिकता असल्याचा आणि पंजाबच्या पोलिस दलाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. भाजपच्या पंजाब युनिटचे नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी ट्विट केले की, केजरीवाल ज्या प्रकारे पंजाब पोलिसांचा गैरवापर करत आहेत ते निषेधार्ह आहे. पंजाब पोलिसांनी तेजिंदर पाल सिंग बग्गा याला त्याच्या घरातून अटक केली आहे. पोलिसांनी बग्गा आणि त्याच्या वडिलांना अमानुष वागणूक दिली. पण, अरविंद केजरीवाल लक्षात ठेवा, तुमच्या अशा कृतीने खऱ्या शीखांना घाबरवता येणार नाही, असे चुग यांनी म्हटले आहे.


आप ने काय म्हटले आहे 


दरम्यान, आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी बग्गाच्या अटकेवरून 29 एप्रिल रोजी पटियाला येथे झालेल्या संघर्षाचा संदर्भ दिला. तर दुसरीकडे पंजाब पोलिसांनी 1 एप्रिल रोजी मोहालीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात भाजप नेत्याला अटक केल्याचे सांगितले. 1 एप्रिलला दाखल झालेल्या एफआयआरमध्ये बग्गा यांच्या 30 मार्चच्या वक्तव्याचा संदर्भ आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनादरम्यानचा संदर्भ आहे.


बग्गा यांची विधाने जातीयवादी 


बग्गा यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा आणि हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याविरोधात राज्य पोलिसांनी गेल्या महिन्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.  अशा विधानांमुळे पंजाब पोलिसांनी एफआयआर नोंदवला आणि बग्गाला अटक केली. त्यांची विधाने जातीयवादी होती असे आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.



बग्गा तपासात सहभागी झाले नाहीत, पंजाब पोलिसांचे वक्तव्य 


बग्गाच्या अटकेनंतर, पंजाब पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आरोपींना तपासात सामील होण्यासाठी फौजदारी दंड संहितेच्या कलम 41A अंतर्गत पाच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिसा 9, 11, 15, 22 आणि 28 एप्रिल रोजी रीतसर बजावण्यात आल्या होत्या. असे असतानाही बग्गा जाणूनबुजून तपासात सहभागी झाले नाहीत. कायद्याच्या योग्य प्रक्रियेनंतर बग्गाला शुक्रवारी सकाळी दिल्लीतील जनकपुरी भागातील त्यांच्या घरातून अटक करण्यात आल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले. मोहालीच्या सनी अहलुवालियाने बग्गा यांच्यावर धार्मिक भावना दुखावण्यासाठी, शत्रुत्व वाढवण्यासाठी आणि शत्रुत्व, द्वेष आणि द्वेषाची भावना निर्माण करण्यासाठी चिथावणीखोर आणि खोटी विधाने केल्याचा आरोप केला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-ए, ५०५ आणि ५०६ अंतर्गत बग्गा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: