सिअॅम या कार उत्पादक संघटनेच्या वार्षिक कार्यक्रमात ते बोलत होते.
वीजेवर चालणाऱ्या गाड्यांसदर्भात मंत्रिमंडळाचा अहवाल तयार आहे. त्यामध्ये वाहनं चार्ज करणाऱ्या स्टेशन्सचा विचार करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलंय.
सर्व कार कंपन्यांनी 2030 पर्यंत इलेक्ट्रिक कारच्या दिशेने वाटचाल सुरु करण्याचा सल्ला गडकरींनी दिला.
“सरकार कोणत्याही परिस्थितीत तेल किंवा पेट्रोल/डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांपासून सुटका करु इच्छित आहे. त्यासाठी 2030 पर्यंतची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तोपर्यंत कार कंपन्यांनी इलेक्ट्रिक कारचं उत्पादन वाढवलं नाही, तर पेट्रोल/डिझेलवर चालणाऱ्या आणि धूर सोडणाऱ्या गाड्या आणि कार कंपन्यांवर बुलडोझर चालवला जाईल”असं गडकरी म्हणाले.
प्रदूषण नियंत्रण आणि इंधन आयतीला वेसण घालण्याच्या निर्धाराशी मी कटिबद्ध आहे, असंही गडकरींनी यावेळी नमूद केलं.
आपल्याला पर्यायी इंधनाकडे वाटचाल करावी लागेल. मी जे बोलतोय ते तुम्हाला आवडणार नाही. पण त्याबद्दल मी तुम्हाला (कार कंपन्यांना) विचारणारही नाही. मी या गाड्या उद्ध्वस्त करणार. प्रदूषण, वाहन आयातीबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे. आयात घटवणे आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी नितीही ठरली आहे. ज्या कंपन्या सरकारचं समर्थन करतील, त्या फायद्यात राहतील, पण ज्या कंपन्या ‘नोटा छापण्यात’ व्यस्त असतील त्यांना मात्र त्रास होईल. त्या कंपन्यांवर/गाड्यांवर बुलडोझर चालवला जाईल. त्यावेळी तुम्ही आमच्याकडे वाहनांचा ढिग आहे म्हणून सरकारकडे मदतीसाठी येऊ नका, असं गडकरींनी ठणकावलं.