नवी दिल्ली: एकीकडे दिल्लीतील जंतरमंतरवर देशातील महिला खेळाडूंकडून कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर लैंगिक शोषणाचा आरोप होत असताना दुसरीकडे दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षाच दिल्लीत सुरक्षित नसल्याचं स्पष्ट  झालं आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना गुरुवारी पहाटे रस्त्यात एका मद्यधुंद गाडी चालकाने छेडछाड केल्याचा आणि ओढत नेल्याची घटना घडली आहे. स्वत: स्वाती मालिवाल यांनी ही माहिती दिली आहे. 


स्वाती मालीवाल यांनी एक ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, "दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी मी गेल्यानंतर एका मद्यधुंद गाडी चालकाने माझ्याशी छेडछाड केली. मी त्याला पकडले त्यावेळी त्याने गाडीच्या खिडकीमध्ये हात अडकवला आणि मला ओढत नेलं. देवाने जीव वाचवला. जर दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील तर परिस्थितीची कल्पना करा."


 






राजधानीतील महिलांच्या सुरक्षेची स्थिती तपासण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या असताना मालीवाल यांना स्वत:लाच छेडछाडीच्या घटनेला सामोरं जावं लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 


स्वाती मालीवाल गुरुवारी पहाटे 3.11 च्या सुमारास एम्स जवळील फुटपाथवर असताना हरीश चंद्रा हा माणूस बलेनो कारमध्ये चढला आणि त्याने मालीवाल यांच्याशी छेडछाड केली. तो खूप मद्यधुंद अवस्थेत होता. त्यावेळी महिला आयोगाची टीम त्या ठिकाणापासून काही अंतरावर होती. दिल्लीतील घडलेल्या या गंभीर घटनेप्रकरणी 47 वर्षीय हरीश चंद्रा या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 


नेमकं काय घडलं? 


स्वाती मालीवाल यांनी त्या व्यक्तीसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर त्याने गाडी पुढे नेली, पण नंतर त्याने पुन्हा यू टर्न घेतला आणि स्वाती मालीवाल यांना जबरदस्तीने कारमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मालीवाल यांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने त्यांना 15 मीटरपर्यंत ओढत नेले. नंतर मालीवाल यांनी स्वत:ची सुटका केली. या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याची कार जप्त करण्यात आली आहे.


ही बातमी वाचा: