बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळ येथील श्री जगद्गुरू मडीवाळेश्वर शिवयोगी मठाचे मठाधिश बसव सिध्दलिंग स्वामीजी यांनी आत्महत्या केली आहे. मठातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.


 गेल्या काही दिवसापासून दोन महिलांचे संभाषण असलेली ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. त्या ऑडियो क्लिपमध्ये  मठाधिशांच्या चारित्र्याबद्दल दोन महिला बोलत होत्या. त्यामुळे स्वामीजींच्या मनाला लागले. सोमवारी सकाळी स्वामीजींनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सकाळी मठातील सेवक त्यांच्या खोलीकडे गेला असता त्याला स्वामीजींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली आणि स्वामीजींचे भक्त मोठ्या संख्येने मठाकडे जमा झाले. बैलहोंगल पोलिसांनी देखील वृत्त समजताच मठाकडे धाव घेतली. स्वामीजींनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. 




व्हायरल ऑडियो क्लिप ऐकल्यापासून  मला जीवनच नको झाले आहे असे स्वामीजींनी आपल्या भक्तांकडे बोलताना सांगितले होते. मनगुंडी गावची सत्यक्का आणि गंगावती येथील रुद्रक्का या दोन महिलांची संभाषणाची ही ऑडियो क्लिप असून त्या दोन महिलांची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय स्वामीजींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका भक्त मंडळी आणि ग्रामस्थांनी घेतली आहे.


2007 साली श्री बसवसिद्ध लिंगेश्वर स्वामींनी मठाधिश म्हणून सूत्रे स्वीकारली होती. मठाच्या पंचक्रोशीत त्यांना खूप मान होता. कोणाचीही समस्या असली तर स्वामीजींच्याकडे गेल्यावर ते निश्चित समस्येचे निराकरण करत असत. त्यामुळे भक्तमंडळी त्यांना खूप मान देत असत. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. माझ्या मृत्यूला मीच कारणीभूत आहे असे स्वामीजींनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिले आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे