Car Seat Belt: उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं अपघातात निधन झालं आहे. त्यांची कार दुभाजकाला धडकण्यापूर्वी सुसाट वेगाने जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघातात झाला तेव्हा मिस्त्री हे मागील सीटवर बसले होते आणि त्यांनी सीटबेल्ट घातला नव्हता. ज्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी प्रत्येकाने कारच्या मागील सीटवर बसलेले असतानाही सीटबेल्ट घालण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्वीट करत हे आवाहन केले आहे.


काय म्हणाले आनंद महिंद्रा  


आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ''मी कारच्या मागच्या सीटवरही नेहमी माझा सीटबेल्ट घालण्याचा संकल्प करतो. मी तुम्हा (लोकांना) सर्वांना विनंती करतो की तुम्हीही हा संकल्प करा. आपण सर्व यासाठी आपल्या कुटुंबांचे ऋणी आहोत." अनेकदा समोरच्या सीटवर बसलेले लोक प्रवासादरम्यान सीटबेल्ट लावतात. मात्र मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना ते गरजेचं वाटत नाही. मात्र मागच्या सीटवर बसताना सीटबेल्ट लावल्यास अपघात झाल्यास जीवितहानीचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो. अशातच महिंद्रा यांनी लोकांना कारच्या मागच्या सिटीवर बसताना सीटबेल्ट लावण्याचे आवाहन केले आहे.







सीट बेल्टमुळे मृत्यूचा धोका 25% कमी होतो


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (World Health Organization) म्हणण्यानुसार, मागील बेल्टचा वापर केल्याने मागील सीटवर बसलेल्या लोकांच्या मृत्यूचा धोका 25% पर्यंत कमी होऊ शकतो. तसेच पुढील सीटचे प्रवासी देखील इजा किंवा मृत्यूच्या धोक्यापासूनही वाचू शकतात. कारण अपघात झाल्यास सीटबेल्ट बांधल्यामुळे मागील सीटचे प्रवासी पुढच्या सीटच्या प्रवाशांना धडकत नाहीत. अशा अनेक गाड्या आहेत ज्यात सीटबेल्ट लावून अपघात झाल्यास एअरबॅग उघडल्या जातात. मात्र आता सीटबेल्ट नसतानाही एअरबॅग सर्व वाहनांमध्ये काम करतात. पण तरीही सीटबेल्ट घातल्याने तुमचा जीव वाचण्याची शक्यता खूप वाढते.