झारखंड : स्वामी अग्निवेश यांना भाजप कार्यकर्त्यांची बेदम मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 17 Jul 2018 05:43 PM (IST)
स्वामी अग्निवेश (78) दमिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी जात होते. ते हॉटेलमधून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.
रांची : झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवत मारहाण केली. स्वामी अग्निवेश (78) दमिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी जात होते. ते हॉटेलमधून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. झारखंडमध्ये भाजपचीच सत्ता आहे. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हल्लेखोर कार्यकर्त्यांनी अगोदर घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले आणि त्यानंतर मारहाण केली. स्वामी अग्निवेश यांच्यासोबत असलेल्या साधूंनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. पोलिसांनी 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराबद्दल आजच आदेश जारी केले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने या आदेशाची एका महिन्याच्या आत अंमलबजावणी करायची आहे. शिवाय या प्रकरणी कायदा बनवण्याचे आदेशही कोर्टाने संसदेला दिले. गोरक्षा करण्याच्या नावावर होणारी हिंसा रोखण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने काही दिशानिर्देश दिले. प्रत्येक प्रकारच्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोर्ट आदेश देईल, असं सुनावणीवेळी कोर्टाने स्पष्ट केलं होतं. भारत हा विविध जाती-धर्मांचा देश आहे. त्याचं संरक्षण करणं सरकारची जबाबदारी आहे. शांतता राखणं हे राज्यांचं कर्तव्य आहे. कोणत्याही प्रकारच्या जमावबाजीला थारा दिला जाणार नाही, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने स्पष्ट केलं.