नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीपर्यंत चालणाऱ्या 'स्वच्छता ही सेवा' या अभियानाची सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशभरातील विविध 18 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ज्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिग बी अमिताभ बच्चन, उद्योगपती रतन टाटा आणि आयटीबीपीच्या जवानांचा समावेश होता. यानंतर मोदींनी दिल्लीतील पहाडगंज भागात स्वतः साफसफाई केली.
यावेळी सर्व मान्यवरांनी स्वच्छता अभियानांचं कौतुक करत या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. ''मी स्वच्छता अभियानाशी जोडला गेलो आहे. या अभियानाच्या प्रचारातही माझा सहभाग होता. माझा चेहरा आणि आवाजच पुरेसा नाही. मी स्वतः अनेक ठिकाणी जाऊ स्वच्छता केली,'' असं बिग बी अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.
स्वच्छ भारत मिशनमध्ये नारी शक्तीचं मोठं योगदान असल्याचं मोदींनी सांगितलं. नमो अॅपच्या माध्यमातून आसामच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ''युवा सामाजिक परिवर्तनाचे दूत आहेत. तरुणांनी भारतात स्वच्छतेच्या संदेशाचा ज्या पद्धतीने प्रसार केला, तो उल्लेखनीय आहे. भारतात सकारात्मक बदल घडवून आणण्यात तरुण सर्वात पुढे आहेत,'' असं मोदी म्हणाले.
''दोन ऑक्टोबर ज्या दिवशी गांधी जयंती आहे, आपण स्वच्छ भारत हे बापूंचं स्वप्न साकारण्याच्या दिशेने स्वतःला समर्पित करावं,'' असं आवाहन मोदींनी केलं. ''स्वच्छता कव्हरेज आता 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, जे चार वर्षांपूर्वी 40 टक्के होतं. हे केवळ चार वर्षात घडलं,'' असं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींनी स्वच्छता मोहिमेचं श्रेय केवळ सरकारलाच नाही, तर लोकसहभागालाही दिलं. गेल्या चार वर्षात नऊ कोटींपेक्षा जास्त शौचालयांची निर्मिती करण्यात आली आणि साडे चार लाखांपेक्षा जास्त गावांनी उघड्यावर शौचेला जाण्यापासून मुक्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
केवळ शौचालयांची निर्मिती करुनच भारत स्वच्छ होणार नाही, असं मोदींनी जोर देऊन सांगितलं. ''स्वच्छता ही एक सवय आहे, जी आपण लावून घ्यावी लागते आणि दररोजच्या जीवनात काही बदल घडवून आणणंही गरजेचं आहे,'' असं आवाहन मोदींनी केलं.
'स्वच्छता ही सेवा' अभियानाची सुरुवात, हातात झाडू घेऊन मोदींकडून सफाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2018 12:36 PM (IST)
यावेळी पंतप्रधान मोदींनी देशभरातील विविध 18 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ज्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिग बी अमिताभ बच्चन, उद्योगपती रतन टाटा आणि आयटीबीपीच्या जवानांचा समावेश होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -