श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चौगाममध्ये सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. सध्या दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरु आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, चौगम भागात दहशतवाद्यांसोबत चकमक जारी आहे. या दहशतवाद्यांना मारणं ही पोलिसांची मोठी कामगिरी आहे. कारण, मारलेल्या दहशतवाद्यांमध्ये लश्कर आणि हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या संघटनांचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात आहे. यापैकी काही जणांवर दोन बँक कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा आणि लूट केल्याचा आरोप आहे.
चौगाममध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. या माहितीच्या आधारावर सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्च ऑपरेशन चालू असतानाच दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलाने केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
दरम्यान, 13 सप्टेंबर रोजीही जम्मू काश्मीरमधील तीन विविध कारवाईत सुरक्षा दलांनी आठ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या मारलेल्या दहशतवाद्यांपैकी तीन जण पाकिस्तानचे असल्याचं समोर आलं. या तीन जणांना पाकिस्तानला लागून असलेल्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मारण्यात आलं. जैश ए मोहम्मद (जेईएम) च्या दोन दहशतवाद्यांना सोपोर भागातील आणि जेईएमशी संबंधित तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना रियासी जिल्ह्यात 33 तास चाललेल्या चकमकीत कंठस्नान घालण्यात आलं.