नवी दिल्ली : गांधी जयंतीच्या निमित्ताने आज 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022'  घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात इंदूरला (Indore) सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून बाजी मारली आहे. तर सुरत आणि नवी मुंबईने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या गंगा नदीच्या काठावरील शहरांमध्ये बिजनोरने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नाशिकच्या देवळालीने कॉन्टेन्मेंटमध्ये पहिली बाजी मारली आहे.


राज्यांचा विचार करता मध्य प्रदेशने पहिला क्रमांक पटकावला असून छत्तीसगड आणि महाराष्ट्र अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंदूर आणि सुरतने यावर्षी मोठ्या शहरांच्या श्रेणीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या  विजयवाडाची घसरण झाली आहे.  


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतरही प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. 


 






देशातील सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा मान महाराष्ट्रातील देवळालीला मिळाला आहे. शंभरपेक्षा कमी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांमध्ये त्रिपुराने अव्वल स्थान पटकावले आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील पाचगणी प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर छत्तीसगडचे पाटण आणि महाराष्ट्रातील कराड शहरांचा क्रमांक लागतो.


 एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या गंगा नदीच्या काठावरील शहरांमध्ये बिजनोरने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर अनुक्रमे कन्नौज आणि गढमुखेश्वर या शहरांचा क्रमांक लागलो. तर एक लाखांहून अधिक लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये हरिद्वारला सर्वात स्वच्छ गंगा शहर म्हणून घोषित करण्यात आले, त्यानंतर वाराणसी आणि ऋषिकेश यांचा क्रमांक लागतो.


स्वच्छ भारत मिशन (शहरी) च्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी आणि विविध स्वच्छता आणि स्वच्छता मापदंडांच्या आधारे शहरी स्थानिक संस्था (ULB) श्रेणीबद्ध करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची 7 वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.