5G services : आजपासून देशात 5G इंटरनेट सेवेची (5G Internet Service) सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022) 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. 5G मुळे इंटरनेटचा वेग वाढणार आहे. तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने ( FICCI )  5G हा देशाच्या आर्थिक प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. 


 फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( FICCI ) चे अध्यक्ष संजीव मेहता म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 5G सेवांचा शुभारंभ केला. 5G  हा देशाच्या आर्थिक प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. 5G मुळे व्यवसायात सुलभता येईल. शिवाय 5G सेवा डिजिटल क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. कृषी, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्यसेवा, शिक्षण, लॉजिस्टिक आणि वाहतूक, फिनटेक, उद्योग क्षेत्राला चालणा मिळेल. त्याबरोबरच आत्मनिर्भर भारतसाठी हे एक मोठे पाऊल असेल.   


FICCI चे महासंचालक अरुण चावला यांनी 5G ही एक पिढीची झेप असल्याचे म्हटले आहे.  "5G ही एक पिढीची झेप असून जीडीपीमध्ये दूरसंचार क्षेत्राचे योगदान सध्याच्या 6.5 टक्क्यांवरून 8-9 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मदत करू शकते. 5G सेवा सर्वसमावेशकपणे देशाच्या डिजिटल इकोसिस्टमला चालना देईल. शेवटच्या टप्प्यावर सेवचे वितरण होईल. त्यामुळे देशाच्या सामाजिक-आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल, असे चावला यांनी म्हटले आहे.   


 IT/ITeS समितीचे अध्यक्ष राहुल शर्मा यांनी देखील 5G देशासाठी महत्वाची बाब असल्याचे म्हटले आहे.  “आजचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे. 5G ही भविष्याकडे जाणारी झेप असून जी सर्वांना संधी आणि माहिती मिळवून देण्याचे काम करेल, असे शर्मा यांनी म्हटले आहे. 


अर्थव्यवस्थेला चालणा मिळणार


2023 ते 2040 दरम्यान 5G तंत्रज्ञानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत 450 अब्ज डॉरलची भर पडेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. भारतातील 5G ​​मध्ये परिवर्तन करण्याची क्षमता आहे, असे तज्ज्ञांना वाटते. 


टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल होणार 
5G नेटवर्कचा भारताला खूप फायदा होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात 5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर 5G नेटवर्कचा शुभारंभ हे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. 


महत्वाच्या बातम्या


5G Internet : देशात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ; डिजिटल इंडिया चळवळीला गती मिळणार : पंतप्रधान मोदी