लखनऊ : उत्तर प्रदेशातील ठाकूरगंजमध्ये लपलेल्या संशयित दहशतवाद्याला ठार करण्यात यश आलं आहे. कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव सैफुल्लाह असून तो आयसिसशी संबंधित असल्याची माहिती एसटीएसनं दिली आहे.
आतापर्यंत भारतात आयसिसकडून दहशतवादी हल्ला झाला नव्हता. त्यामुळे देशात आयसिसने घडवलेला हा पहिलाच हल्ला मानला जात आहे. सोबतच आयसिसने भारतात शिरकाव केल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
ठाकूरगंज हा वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो. इथून उत्तर प्रदेश विधानसभा 8 किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचं वातावरण असल्याने हे प्रकरण गंभीर मानलं जात आहे.
दहशतवाद्याचा खात्मा कसा केला?
ज्या घरात हा दहशतवादी लपून बसला होता, त्या इमारतीत रात्री पोलीस आणि एटीएसनं प्रवेश केला. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत एटीएस आणि दहशतवाद्यामध्ये गोळीबार सुरु होता. इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं असल्यानं त्याच्याकडूनही गोळीबार सुरु होता.
अखेर अकरा तासांनंतर त्याला ठार करण्यात यश आलं. त्याआधीच्या कारवाईदरम्यान पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि मिरची बॉम्ब फोडले. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजण्यापूर्वीही दोन्ही बाजूंनी अधून मधून गोळीबार सुरु होता. मध्यप्रदेशात झालेल्या भोपाळ-उज्जैन ट्रेन ब्लास्टशी या दहशतवाद्याचा संबंध असल्याचं मानलं जातं.