नवी दिल्ली : ज्येष्ठ बंगाली लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवींच्या निधनानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करुन श्रद्धांजली दिली आहे. या ट्वीटमध्ये स्वराज यांनी महाश्वेता देवींच्या दोन पुस्तकांचीही नोंद केली आहे. पण त्यांनी ट्वीटमध्ये उल्लेख केलेली पुस्तकं ही महाश्वेता देवी यांची नसून आशापूर्णा देवी यांची असल्याचं समोर आले आहे.


 


परराष्ट्र मंत्र्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन असे चुकीचे ट्वीट होत असल्यामुळे आता स्वराज यांच्यावर टीका होत आहे. त्यांच्या चुकीच्या ट्वीटचा ट्विपल्सनींही समाचार घेतला. इतकंच नाही तर स्वराज यांना स्क्रिप्ट रायटर बदलण्याचा सल्लाही देण्यात आला. टीकेनंतर स्वराज यांच्या हॅण्डलवरुन हे ट्वीट डिलीड केलं.


 


महाश्वेता देवींना श्रद्धांजली देताना सुषमा स्वराज यांनी लिहिलं आहे की महाश्वेता देवींचं आपल्यातून जाणं हे साहित्य जगतासाठी एका युगाचा अंत आहे. तसंच 'प्रथम फलश्रुति' आणि 'बाकुल कथा' या दोन पुस्तकांचा आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव असल्याचं म्हटलं आहे.


 


पण त्यांच्या ट्वीटनंतर ट्विटराईट्सनी सुषमा स्वराज यांना अज्ञानात नेहमीच आनंद नसतो, तसंच स्क्रिप्ट रायटर बदलण्याची सूचनाही केली.


 


प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांचं वयाच्या 90व्या वर्षी कोलकातामध्ये निधन झालं. त्यांना, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी, पद्मविभूषण तसंच रॅमन मॅगसेसे या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.