मुबंई: दोन हजार कोटींचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. ठाणे पोलिसांनी अभिनेत्री ममता कुलकर्णी ही या रॅकेटची मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा प्रमुख साक्षीदार जय मुखीनं आरोप केला आहे की, 'ममताचं नाव घेण्यासाठी माझ्यावर पोलिसांनी दबाव आणला होता.'


 

ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी हे रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता.

 

पोलिसांनी याप्रकरणी साक्षीदार जय मुखीला कोर्टात पेश केलं. जय मुखीनं दिलेल्या जबाबानुसार, पोलिसांनी सांगितलं होतं की, जानेवारी 2016मध्ये केनियातील मोम्बासा इथं मीटिंग झाली होती. ज्यामध्ये एवॉन कंपनीचे अधिकारी आणि विकी गोस्मावी यांच्यामध्ये दर महिन्याला 1000 कोटीच्या 10 टन एफिडरीन ड्रग्स पुरवण्याचा करार झाला होता. या मीटिंगमध्ये ममता कुलकर्णीही होती.

 

या प्रकरणातील प्रमुख साक्षीदारानं आपला जबाब पलटल्यानं या केसमध्ये नवं वळण आलं आहे. जय मुखीनं पोलिसांवर आरोप लावला आहे की, 'ममता कुलकर्णीचं नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्याता आला तसेच माझा छळही करण्यात आला. पोलीस कोठडीदरम्यान बरीच मारहाण करण्यात आली आणि वीजेच झटकेही देण्यात आले.'

 
या साक्षीदारानं कोर्टासमोर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 'मी जर ममता कुलकर्णीचं नाव नाही घेतलं तर ते माझ्या बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला अटक करण्याची धमकी देत होते. यामुळेच मी मॅजिस्ट्रेटसमोर ममता कुलकर्णीविरुद्ध जबाब दिला.

 

जय मुखी म्हणतो की, 'ममता कुलकर्णीला कधीही भेटलो नाही. पोलिसांनी जबरदस्तीनं नाव घ्यायला लावलं.' याआधी ममता कुलकर्णीनं एबीपी माझाशी बोलताना पोलिसांची आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं.

 

सोलापूरमध्ये एमआयडीसीमध्ये 45 एकरमध्ये असलेल्या एवॉन लाईफसायन्सम कंपनीत कोट्यवधीच्या ड्रग तस्करी प्रकरणी ममता कुलकर्णीला आरोपी बनवण्यात आलं आहे.