मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी बिहार पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूडच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील जबाबदार असलेल्या सर्व घटकांचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांनी मुंबई गाठली आहे.
बिहार पोलिसांनी शनिवारी निर्माता रुमी जाफरीची चौकशी केली. रुमी रिया आणि सुशांत यांना घेऊन एका चित्रपटाची निर्मिती करणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे चित्रपट सुरू होऊ शकला नाही. बिहार पोलिसांनी नवी मुंबईतील उलवे येथे जाऊन सुशांत, रिया आणि शोविकच्या कंपनीची नोंदणी असलेल्या ठिकाणी चौकशी केली. त्याचबरोबर या विषयावर राजकारणही सुरू आहे.
शनिवारी संध्याकाळी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ट्वीट केले की, उद्धव ठाकरे यांच्यावर कॉंग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांतच्या प्रकरणातील जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यावर कल दिला जात आहेत. असं करुन काँग्रेस बिहारमधील लोकांना काय तोंड दाखवणार? आता बिहारचा मुलगा सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीसाठी आलेल्या बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांचंही सहकार्य मिळत नाही. बिहार सरकारने केवळ चौकशीचे आदेश दिले नाहीत तर रिया चक्रवर्ती यांच्या याचिकेवर सुनावणी करताना बिहारची बाजू ऐकली जावी, अशी विनंती करून सर्वोच्च न्यायालयात कॅविएट दाखल केली. बिहार सरकार सुशांतला न्याय देण्यासाठी कोणत्याही थराला जाईल. नवोदित अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे कोट्यावधी बिहारी लोकांना धक्का बसला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी हवी आहे. पूर्वी महाराष्ट्रात बिहारमधील लोकांना गैरवर्तन केल्याच्या तक्रारी येत असत, पण आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कुरघोडीवर आधारित उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मर्यादा ओलांडल्या आहेत.
यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एबीपी न्यूजशी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले होते. ते म्हणाले की, राजपूत कुटुंबीयांनी मागणी केल्यास सीबीआय चौकशीची शिफारस करू. न्याय मिळण्यासाठी आवश्यक असेल तर स्पीड ट्रायलही करु, त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सहकार्य केले पाहिजे.