Gyanvapi mosque : वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मशिदीच्या आवारात असलेल्या शृंगार गौरीच्या दैनंदिन पूजेच्या मागणीवरून नवा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दिवाणी न्यायालयाने सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. सलग तीन दिवस चाललेले सर्वेक्षणाचे काम थांबवण्यात आले आहे. सर्वेक्षणाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून शनिवारी पाहणी पथक मशिदीच्या आत गेल्याने गोंधळ झाला. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम थांबवण्यात आले आहे. मशीद व्यवस्थापनाकडून सर्व्हे कमिटीला शनिवारी मशिदीत प्रवेश करण्यास विरोध केला. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम थांबवावे लागले.
सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पाहणी पथक मशिदीच्या आत गेल्याने गोंधळ झाला. त्यानंतर पथकाला काम करणे कठीण झाले. पाहणी पथक आणि व्हिडीओग्राफी टीम मशिदीच्या बाहेर पोहोचली, परंतु, त्यांना मशिदीत प्रवेश देण्यात आला नाही. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 9 मे रोजी होणार आहे. ज्ञानवापी मशिदीच्या आवारात प्रवेश करायचा की नाही यावरून शुक्रवारपासून वाद सुरू आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून मशिदीबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
सर्वेक्षण पथक शुक्रवारी ज्ञानवापी मशिदीत पोहोचले त्यावेळी मोठा गोंधळ झाला. मशिद परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे हा गोंधळ फारसा वाढला नाही, मात्र सर्वेक्षणाचे काम रखडले आहे. मुस्लिम समाजाकडून या प्रकरणात निष्पक्ष कारवाईवर शंका उपस्थित केली जात आहे. शिवा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी केली. परंतु शनिवारी न्यायालयाने हे अपील फेटाळून लावले.
या प्रकरणात हिंदू समाजाच्या वतीने मशिदीच्या आवारात असलेल्या शृंगार गौरीच्या दैनंदिन पूजेची मागणी केली जात असून त्यासाठी संपूर्ण संकुलाची पाहणी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. हिंदू समाजाचे म्हणणे आहे की, शृंगार गौरीच्या मूर्तीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मशिदीच्या आत जावे लागेल. त्यामुळेच पाहणी पथक वारंवार मशिदीच्या आत जाऊन सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफी करण्याचा प्रयत्न करत आहे.
मुस्लिम समाजाने दावा केला आहे की, मशिदीच्या पश्चिम भिंतीच्या बाहेर शृंगार गौरीची मूर्ती आहे. सर्वेक्षणाला कोणताही आक्षेप नाही. परंतु, सर्वेक्षण पथकाला मशिदीच्या आत जाण्यास आक्षेप आहे. न्यायालयाने मशिदीच्या आत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले नाहीत.
पाहणी पथकाला मशिदीच्या आत जाण्यापासून रोखण्यावरून मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद
सर्वेक्षण पथकाला मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखण्यामागील मुस्लिम बाजूचा तर्क असा आहे की देवतांच्या मूर्ती मशिदीच्या आत नसून पश्चिमेकडील भिंतीच्या बाहेरील बाजूस आहेत.
ज्ञानवापी मशिदीबाबतचा नवा वाद काय आहे?
ज्ञानवापी मशिदीचा नवा वाद जुन्या वादापेक्षा वेगळा आहे. नवा वाद मशिदीच्या आवारातील शृंगार गौरी आणि इतर देवतांच्या दैनंदिन पूजेच्या अधिकाराबाबत आहे. ज्ञानवापी मशिदीचा नवीन वाद 18 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाला. यावेळी वाराणसीच्या पाच महिलांनी शृंगार गौरी मंदिरात दररोज पूजा करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती. परंपरेनुसार या ठिकाणी वर्षातून दोनदाच पूजा केली जात असे. मात्र आता मशिदीच्या आवारातील इतर देवतांच्या दैनंदिन पूजेला अडथळा येऊ नये, अशी या महिलांची मागणी आहे.
न्यायालयात या अपिलावर दिवाणी न्यायाधीशांनी परिसराचे सर्वेक्षण व व्हिडीओग्राफी करण्याचे आदेश देत 10 मे रोजी अहवाल मागवला आहे. याआधीही मशिदीशी संबंधित वाद आहे.
ज्ञानवापी मशिदीबाबत जुना वाद काय आहे?
1991 मध्ये ज्ञानवापी मशिदीच्या अस्तित्वाबाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. ज्या ठिकाणी मशीद बांधण्यात आली ती जागा काशी विश्वनाथची जमीन असून छोटी मंदिरे उद्ध्वस्त करून मशीद बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
हिंदू पक्षाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडे चौकशी करण्याचे आवाहनही केले होते. यानंतर 9 सप्टेंबर 2021 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीतील एएसआयच्या सर्वेक्षणाला स्थगिती दिली. तेव्हापासून ही स्थिती कायम आहे.