नवी दिल्ली: उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन तब्बल 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. पण हेच सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन आठ दिवसांपूर्वीच ठरलं होतं.
उरी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. पाकला भारतानं योग्य धडा शिकवावा अशीच देशवासियांची मागणी होती. आणि याच वेळी सुरु झालं होतं ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक.
‘पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे. आता वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू.’ अशा स्पष्ट शब्दात महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी पाकिस्तानला बजावलं होतं. याच दिवसापासून भारतानं पाकला धडा शिकवण्यासाठी या नव्या ऑपरेशनची आखणी सुरु केली होती.
रणबीर सिंह यांच्या या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला होता. चार दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी वॉर रुममध्ये तिन्ही सुरक्षा दलाच्या प्रमुखांसह तब्बल दोन तास चर्चा केली होती.
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई असते. सोप्या भाषेत शत्रूची ठिकाण पाहून, तिथे घुसून मारणं होय.
कशी झाली कारवाई?
कालच दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. मात्र त्याची कुणकुण भारताला लागली. भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला.
भारतीय जवान हेलिकॉप्टरने घुसले
बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरकडे मोर्चा वळवला. जवानांनी आधी हेलिकॉप्टरने अतिरेक्यांच्या तळाकडे कूच केली. मग हेलिकॉप्टरमधून उतरून, जवानांनी चालत जाऊन अतिरेकी तळांना घेरलं आणि हल्लाबोल केला.
7 तळं उद्ध्वस्त करुन गुपचूप परतले
भारतीय जवानांनी LOC पार करुन सुमारे दोन किमी आत घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला. मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 पर्यंत ही कारवाई करण्यात आली. यावेळी भारतीय जवानांनी एक-दोन नव्हे तर 7 तळं उद्ध्वस्त केली. इतकंच नाही तर हा हल्ला करुन, जवान गुपचूप भारतात परतले.
हॉटस्प्रिंग, लिपा, केल, भिंबर या अतिरेकी तळांवर भारतीय जवानांनी हल्ला करुन, उरी हल्ल्याचा बदला घेतला.
संबंधित बातम्या:
आता वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू: लेफ्टनंट जनरल
सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले?