नवी दिल्ली: सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या विरोधकांना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्यदलाने सर्जिकल स्ट्राईक 100 टक्के यशस्वी केलं. विशेष म्हणजे याचे पुरावे आम्हाला द्यायची गरज नाही, कारण सध्या पाकिस्तानच याचं उत्तर देत आहेत, असे ते म्हणाले.


एका कार्यक्रमानिमित्त आग्र्यात आलेल्या मनोहर पर्रिकरांचे एखाद्या युद्ध जिंकून आलेल्या जवानांप्रमाणे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना ''काही लोक सध्या सैन्यदलाकडून पुरावे सादर करण्याची मागणी करत आहेत. पण आम्ही त्यांच्यासमोर कसलेही पुरावे सादर करणार नसल्याचे,'' त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने पाकिस्तानचा सर्जिकल स्ट्राईक संदर्भातील खोटारडेपणा उघडा पाडण्यासाठी पुरावे सादर करण्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भात बोलताना पर्रिकरांनी ही प्रतिक्रीया दिली.