नवी दिल्ली : सिंगापूरच्या एका विद्यापीठातील राहुल गांधींचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण, या कार्यक्रमाच्या व्हिडीओशी छेडछाड करुन काँग्रेसने ट्वीट केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ प्रसेनजित बसू यांनी काँग्रेसला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

सिंगापूरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भारतीय वंशाच्या व्यक्तींची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरंही दिली. पण या कार्यक्रमावरुनच अर्थतज्ज्ञ प्रसेनजित बसू यांनी काँग्रेसला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.


कारण, काँग्रेसने या कार्यक्रमाचा जो व्हिडीओ ट्वीट केलेल्या व्हिडीओत त्यांनी राहुल गांधींना विचारलेला प्रश्न चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा दावा बसू यांनी केला आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधींनी ज्या प्रश्नाला उत्तर देत होते, तो प्रश्नदेखील आपला नसल्याचं बसू यांचं म्हणणं आहे.

बसू यांनी काँग्रेसवर व्हिडीओशी छेडछाडीचा थेट आरोप केला नसला, तरी हा व्हिडीओ म्हणजे, ‘क्लासिकल फेक न्यूज व्हिडीओ’ असल्याचे सांगितलं आहे. काँग्रेसने केवळ बसू यांचा प्रश्न सेन्सर केला नाही, तर राहुल गांधींच्या उत्तराला हायलाईट केल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच हे उत्तर ज्या प्रश्नासाठी होते, तो प्रश्न दुसऱ्याच व्यक्तीने विचारल्याचा त्यांचा दावा आहे.

तसेच, काँग्रेस पक्ष आपल्या अध्यक्षाचा चुकीच्या प्रचार पद्धतीने करत असल्याचंही म्हटलं आहे. शिवाय, हा व्हिडीओ तात्काळ हाटवला नाही, तर सिंगापूरच्या कोर्टात कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा इशाराही दिला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट करुन म्हटलंय की, “काँग्रेसने हा व्हिडीओ तात्काळ हटवावा. अन्यथा सिंगापूरच्या कोर्टात कायदेशीर कारवाईला सामोरे जावे.”


वास्तविक, बसू यांनी विचारले होते की, अनेक दशके देशाची सूत्रं तुमच्या कुटुंबाच्या हातात होती. पण या काळात देशातील प्रत्येक व्यक्तीचं सरासरी उत्त्पन्न कमी का होता? उलट जेव्हा तुमच्या कुटुंबाकडून पंतप्रधान पद गेलं, तेव्हा मात्र, भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या सरासरी उत्पन्नात वाढ झाल्याचं चित्र होतं.”

दरम्यान, या व्हिडीओत काँग्रेसने जवाहर लाल नेहरुंवरील टिप्पणीनंतरच्या भागाला कात्री लावल्याचा बसू यांचा दावा आहे. कारण, बसू यांच्यानंतर आणखी एका व्यक्तीने राहुल गांधींना विचारलं होतं की, “मी तुमच्या पणजोंबाचा मोठा प्रशंसक होतो. माझ्या मते, देशात जे काही चांगलं होतंय, ते सर्व काँग्रेसमुळेच होतंय.” त्या व्यक्तीच्या प्रश्नानंतरच राहुल गांधींचं उत्तर दाखवलं आहे.