नवी दिल्ली: ‘अच्छे दिन’ वास्तवात कधीच नसतात, ते मानण्यावर असतात, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केलं. ते ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव’मध्ये बोलत होते.
भाजप 2019 च्या निवडणुकीत ‘अच्छे दिन’ आले असं जनतेला सांगू शकेल का? असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला.
त्यावर गडकरी म्हणाले, “वास्तवात ‘अच्छे दिन’ नसतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या सद्य परिस्थितीवर कधीच संतुष्ट नसतो. जो नगरसेवक होतो, तो आमदार झालो नाही म्हणून दु:खी असतो. जो आमदार असतो तो खासदार न झाल्याने दु:खी असतो. खासदार असतो तो मंत्री न झाल्याने दु:खी असतो. मंत्री चांगलं खातं न मिळाल्याने दु:खी असतो. म्हणजे लोक असाच विचार करत असतात. ते स्वत:च्या परिस्थितीवर कधीच समाधानी नसतात. ज्याच्याकडे मर्सिडीज आहे तो दु:खी आहे, ज्याच्याकडे दुचाकी आहे तो सुद्धा दु:खी आहे. त्यामुळे अच्छे दिन हे मानण्यावर असतात”
अच्छे दिनचा अर्थ अन्न, वस्त्र आणि निवारा आहे. पंतप्रधान आवास योजनेतून घरं बनत नाहीत का? सागरमाला प्रकल्पांतर्गत 16 लाख कोटीची गुंतवणूक होत आहे. हे अच्छे दिन नाहीत का, असा सवाल गडकरींनी विचारला.
‘सोनियांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने’
2019 मध्ये भाजपला सत्तेवरुन खाली खेचून पुन्हा यूपीए सरकार सत्तेत येईल, असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्याबाबत गडकरींना विचारलं असता, ते म्हणाले “काँग्रेसला 2019 मध्ये पुन्हा सत्तेत येऊ असं वाटणं म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहे. नुकतंच ईशान्य भारतातील निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. आम्ही जिंकत आहोत, केरळ आणि बंगालमध्येही चांगली कामगिरी करु. काँग्रेसला 50 वर्षात जे जमलं नाही, ते आम्ही 4 वर्षात करुन दाखवलं. सर्व अपेक्षा 5 वर्षात पूर्ण होणं शक्य नाही. भाजप 2019 मध्ये पुन्हा सत्तेत येईल”