सूरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूट खरेदी करणारे व्यापारी लालजीभाई पटेल यांनी तब्बल सहा हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सरकारकडे जमा केल्या आहेत, असं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र आता स्वत: लालजीभाई पटेल यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'एबीपी माझा'ची संलग्न वाहिनी एबीपी अस्मिताला दिलेल्या प्रतिक्रियेत लालजी पटेल यांनी सहा हजार कोटींच्या नोटा सरकारकडे जमा केल्या नाहीत, असा दावा केला आहे. त्यामुळे ही केवळ सोशल मीडियावरील अफवा असल्याचं समोर आलं आहे. काळ्या पैशांवर आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचं जाहीर केलं होतं.

मोदींचा सूट खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने जमा केल्या 6000 कोटींच्या जुन्या नोटा

यानंतर मोदींचा सूट खरेदी करणारे सूरतमधील हिऱ्यांचे व्यापारी यांनी तब्बल सहा हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सरकारकडे जमा केल्याचं वृत्त पसरलं होतं. या वृत्तानंतर लालजीभाई आणि नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारे ट्वीट्स आणि फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या वृत्ताबाबत लालजीभाई यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला. "हे वृत्त चुकीचं आहे. मी सहा हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा केल्या नाहीत. मी हिऱ्यांचा व्यापारी आहे. तसंच माझा आयात-निर्यातीचा व्यवसाय देखील आहे. माझा लोकल बिझनेस नाही, त्यामुळे पैसे जाहीर करण्याचा प्रश्नच नाही," असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, लालजीभाई पटेल यांनी काही महिन्यांपूर्वी 4.3 कोटी एवढी मोठी रक्कम मोजून नरेंद्र मोदींचा सूट खरेदी केला होता. गिनीज बुकमध्येही त्यांच्या नावाची नोंद झाली होती. या सूटवर लहान अक्षरात नरेंद्र मोदी यांचं नाव लिहिलं होतं. पाहा व्हिडीओ