नवी दिल्ली: पैसे बदलण्यासाठी तेच तेच लोक सातत्याने रांगेत उभे राहात असल्याने गर्दी वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी मतदानाप्रमाणे निशाणी म्हणून शाई लावण्यात येईल, असं केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी सांगितलं.
इतकंच नाही तर नव्या दोन हजाराच्या नोटा खास प्रणालीद्वारे छापल्या आहेत. इटँग्लिओ इंकने 2 हजाराच्या नोटेची छपाई केली आहे. हलका रंग जाणं हीच त्याची खासियत आहे. त्यामुळे थोडा रंग गेल्यास तुमची नोट खरी आहे, असंही अर्थसचिवांनी सांगितलं.
नोटांचा रंग जात असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. मात्र अर्थसचिवांच्या या स्पष्टीकरणामुळे तो संभ्रम दूर होण्यास मदत होईल.
जनधन खात्याचा गैरवापर टाळा
तसेच जनधन खात्याचा गैरवापर करु न देण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. जनधन खात्यावर 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यास चौकशी होऊ शकते. जर जनधन खात्याचा गैरवापर झाल्याचं लक्षात आलं, तर कारवाईचा इशारा अर्थसचिवांनी दिला.
मंदिर, ट्रस्टच्या देणग्यांवर लक्ष
यावेळी अर्थसचिवांनी मंदिर, ट्रस्टच्या देणग्यांवर लक्ष ठेवणार असल्याचंही सांगितलं. १०-२०-५०-१०० च्या नोटा, सुट्टे, चिल्लर पैसे देण्यासाठी मंदिर, धार्मिक स्थळं, ट्रस्टंना आवाहन केलं आहे, असं अर्थसचिव म्हणाले.
तसंच जी सरकारी रुग्णालयं, मेडिकल 500-1000 च्या नोटा स्वीकारत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
नोटांबाबत सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवू नका - अर्थसचिव
जी सरकारी रुग्णालयं, मेडिकल 500-1000 च्या नोटा स्वीकारत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करणार
१०-२०-५०-१०० च्या नोटा, सुटे, चिल्लर पैसे देण्यासाठी मंदीर/ धार्मिक स्थळ/ट्रस्टंना आवाहन केलं गेलंय - अर्थ सचिव
मंदिर, ट्रस्टमधील देणग्या, जनधन खात्यावरही लक्ष ठेवणार
जनधन खात्याचा वापर काळा पैसा पांढरा करण्यासाठी करु देऊ नका, जनधन खात्यात बेहिशेबी पैसे जमा दिसले तर चौकशीचा ससेमिरा
बँकेतून एकदा पैसे काढल्यानंतर निशाणी करणार,मतदानाप्रमाणे शाई लावणार,गर्दी टाळण्यासाठी निर्णय
काही लोक सातत्याने रांगेत येत असल्याने गर्दी वाढत आहे