SC Collegium : मद्रास उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त होणार्या वकील लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी ( lekshmana chandra victoria gowri) यांच्या विरोधात काही वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी या भाजपच्या सदस्या असल्याचा आरोप या वकिलांनी केला आहे. यासोबतच त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रचार आणि विस्ताराच्या पद्धतींवर आक्षेपार्ह लेख लिहिले असल्याचेही म्हटले आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी या प्रकरणावर उद्या म्हणजेच मंगळवारी 7 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचे सांगितले आहे.
17 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय कॉलेजियमने लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मद्रास उच्च न्यायालयाने पाठवलेल्या नावांमधून लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांच्यासह आठ नावे निवडून सरकारकडे पाठवली होती. त्यापैकी पाच जणांना दोन वर्षांसाठी मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली.
वकिलांचा आक्षेप
कॉलेजियमने लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांची शिफारस सरकारला पाठवल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयातील काही वकिलांनी पत्र लिहून या नियुक्तीला विरोध केला. "लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांनी काही लेख लिहिले होते, ज्यात त्यांनी इस्लामिक लव्ह जिहाद व्यतिरिक्त दक्षिण भारतात ख्रिश्चन धर्माच्या विस्ताराच्या पद्धती देशासाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. असं मत असलेल्या महिलेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करणे योग्य होणार नाही, असे या वकिलांचे म्हणणे आहे. सोमवारी काही वकिलांनीही याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याचिकाकर्त्या वकिलांच्या वतीने ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. सुरुवातीला मुख्य न्यायमूर्तींनी शुक्रवारी (10 फेब्रुवारी) सुनावणी होईल असे सांगितले. मात्र काही वेळाने राजू रामचंद्रन पुन्हा न्यायालयात हजर झाले. त्यांनी सांगितले की, सरकारने लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे या प्रकरणावर तातडीने सुनावणी होणे गरजेचे आहे. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, त्यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर काही सामग्री कॉलेजियमच्या माहितीत आली आहे. कॉलेजियमनेही त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणावर उद्याच सुनावणी होणार आहे. यासाठी खंडपीठ स्थापन करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या