नवी दिल्ली : आधार कार्ड मतदान ओळखपत्राला लिंक करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने तयार दर्शवली आहे. चार आठवड्यांनंतर यावर सुनावणी होणार आहे. निवडणुकीतल्या बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी व्होटर कार्ड आधारशी संलग्न करण्याची मागणी होती.


आधार कार्ड मतदान ओळखपत्राला जोडल्यास बोगस मतदान बंद होईल, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. भाजप नेते, अॅड. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती.

'आधार' आधारित निवडणूक मतदान प्रक्रिया राबवल्यास मतदारांचा सहभाग वाढेल, शिवाय बूथ कॅप्चरिंग आणि बोगस मतदान थांबेल. फिंगरप्रिंटच्या आधारे ही मतदान प्रक्रिया राबवण्याची मागणी असून तसं झाल्यास देशाच्या कुठल्याही भागात बसून मतदार मतदान करु शकेल, असं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे.

नागरिकांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ताही आधार कार्डाला लिंक करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा आणि बेनामी व्यवहारांना आळा घालण्यासाठी ही मागणी केली जात आहे.

याचिकाकर्त्याची बाजू जाणून घेतल्यावर गरज पडल्यास केंद्राकडूनही उत्तर मागवणार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टीस ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर मार्च महिन्यात या प्रकरणी सुनावणी होणार आहे.