नवी दिल्ली : छत्रपती शिवरायांची प्रतिमा मला आत्ता भेट दिली, या प्रतिमेमुळे राष्ट्रपती भवनात जी कमतरता मला अनेकदा जाणवत होती ती पूर्ण झाली. अतिशय उत्कृष्ट अशी ही शिवरायांची प्रतिमा राष्ट्रपती भवनातच राहून या वास्तूची शोभा वाढवत राहील असे भावपूर्ण उद्गार देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.


दिल्लीत प्रथमच साजऱ्या झालेल्या भव्य शिवजयंती सोहळ्यात कोविंद बोलत होते. शिवजयंतीचा उत्साह रायगडापासून दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत पोहचवण्यासाठी यंदा प्रथमच राजधानीत अशा भव्य शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

सकाळी महाराष्ट्र सदनातून भव्य शोभायात्रा निघाली, त्यानंतर दिल्लीतल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रम पार पडला. छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी दुसरं तिसरं कुणी नव्हे तर देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत, नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा उपस्थित होते.

राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने या शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं.



दरम्यान, आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी शिवरायांच्या नेतृत्वगुणांचं कौतुक केलं. केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात भारतीय इतिहासाला निर्णायक योगदान देणारे शिवाजी महाराज हे देशाच्या सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी एक होते असे उद्गार राष्ट्रपतींनी काढले.

छत्रपती शिवरायांबद्दल जाणून घेताना एका व्यक्तिमत्वामध्ये इतके सगळे गुण कसे सामावू शकतात या विचारानंच आपण नतमस्तक होतो. केवळ युद्धकौशल्य नव्हे तर ते एक उत्तम राज्यशासक होते. आजच्या भाषेत बोलायचे तर सिस्टम बिल्डर म्हणजे नवी व्यवस्था निर्माण करणारे होते असे उद्गार राष्ट्रपतींनी काढले.

दिल्लीसह आसपासच्या परिसरातून आलेले हजारो शिवप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमासाठीचं निमंत्रण अवघे काही दिवस उरलेले असताना दिले, मात्र त्यानंतरही राष्ट्रपतींनी यायचं कबूल केलं, याबद्दल खासदार संभाजीराजे यांनी त्यांचे आभार मानले.

इतक्या कमी वेळात आपला प्रोटोकॉल बाजूला ठेवून, त्यातून वेळ काढत ते आले, यातूनच त्यांना शिवरायांबद्दल किती आदर आहे हे स्पष्ट होतं असं संभाजीराजे म्हणाले. शिवाय देशात शिवजयंती हा राष्ट्रीय उत्सव करण्याची विनंती त्यांनी यावेळी राष्ट्रपतींना केली.

संबंधित बातम्या :


मोदी ते बिग बी... दिग्गजांकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा


मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा


राजधानीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शिवजयंतीचा भव्य सोहळा