नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी रा. स्व. संघाला जबाबदार ठरवणं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना चांगलंच महागात पडलं आहे. माफी मागायची नसेल तर खटल्याला सामोरे जा, असं कोर्टाने सुनावलं आहे.
राहुल गांधींविरोधात मुंबईतल्या भिवंडी कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. राहुल यांनी हा खटला रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत जस्टिस दीपक मिश्रा आणि रोहिंटन नरीमन यांच्या पीठाने फटकारलं.
'तुम्हाला तुमच्या वक्तव्याविषयी खंत वाटते का, असं आम्ही तुम्हाला यापूर्वीही विचारलं होतं. यावर तुम्ही तुमच्या वक्तव्याची पाठराखण केलीत. त्यामुळे आता तुम्हाला खटल्याला सामोरं जावं लागेल.' असं कोर्टाने बजावलं.
'हे प्रकरण आयपीसी कलम 499 अंतर्गत येतं का, हे पाहणं आमचं काम आहे. तुम्ही एका व्यक्तीवर नाही, तर संस्थेवर टीका केली आहे. त्यांच्या एका कार्यकर्त्याने केस दाखल केली आहे. ऐतिहासिक संदर्भ देऊन कोणतंही भाषण देऊ नका. तुमचं म्हणणं कनिष्ठ कोर्टात मांडा आणि ते वक्तव्य जनहितार्थ होतं हे सिद्ध करा.' असंही न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं.
कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी एक आठवड्यासाठी पुढे ढकलली आहे. मात्र पुढच्या बुधवारी ही सुनावणी पुढे ढकलणार नसल्याचंही कोर्टाने सांगितलं आहे.