मी राजीनामा दिला नाही, नवज्योत कौर सिद्धूंचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 07:31 AM (IST)
नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार नवज्योत सिंह सिद्धू यांनी सोमवारी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर नवज्योत सिंह यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनीही राजीनामा दिल्याच्या अफवांना जोर आला. मात्र आपण भाजपला रामराम ठोकला नसल्याचं स्पष्टीकरण नवज्योत कौर यांनी दिलं आहे. मी भाजप सोडलेलं नाही, पण भाजप चांगलं काम करत नाहीये, हेही तितकंच खरं आहे, असंही नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या. पती नवज्योत सिंह सिद्धू यांच्या राजीनाम्याविषयी मला सुरुवातीला माहिती नव्हती, मात्र राजीनामा देण्यास त्यांना भाग पाडल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राजकारण हा माझ्यासाठी कधीच व्यवसाय नव्हता आणि नसेल असा टोलाही त्यांनी हाणला आहे. पंजाबची सेवा करणं, हे सिद्धू यांचं कायमच उद्दिष्ट होतं. माझ्या दृष्टीने सरकार फारसं चांगलं काम करत नाहीये. अकाली दलाच्या साथीने जाण्याची त्यांना गरज नव्हती, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.