नवी दिल्ली:  गोवा सत्ता स्थापनेच्या पेचावर सुप्रीम कोर्टात काँग्रेस विरुद्ध भाजपचा सामना रंगला.  कोर्टानेही राज्यपालांप्रमाणेच निर्णय देत, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. 16 मार्चला म्हणजे दोनच दिवसात सकाळी 11 वाजता बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

याशिवाय मनोहर पर्रिकर यांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची काँग्रेसची मागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळली.

तसंच नवं सभागृह अस्तित्त्वात आल्याचं आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना काढण्याची विनंती निवडणूक आयोगाला उद्याच करावी लागणार आहे.

गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपने तयारी केली असतानाच, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्याने मोठा पेच निर्माण झाला .

अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात काँग्रेसची बाजू मांडली, तर भाजपकडून ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे मैदानात उतरले.

सुप्रीम कोर्टाचे काँग्रेसला प्रश्न

  • सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश खेहर जे, रंजन गोगोई आणि जे आर के अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर गोव्याच्या रणसंग्राम रंगला.

  •  काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका केल्याने, सरन्यायाधीश खेहर यांनी पहिलाच प्रश्न काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना केला.

  •  तुमच्याकडे किती आमदारांचं संख्याबळ आहे किंवा कोणत्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे, याबाबत काही कागदपत्र सादर केली आहेत का?

  • तुम्ही किती आमदारांचा पाठिंबा आहे हे दाखवलं असतं, तर ही केस अवघ्या 30 सेकंदात निकाली निघाली असती, असंही कोर्टाने सिंघवींना सांगितलं.

  • तुम्हाला त्यासाठी पुरेसा वेळ होता, एक संपूर्ण रात्रही होती. तडजोडीसाठी रात्रीचीच वेळ चांगली असते,  मात्र तरीही तुम्हाला कुणाचा पाठिंबा आहे, हे सांगणारं एक कागदाचं चिटूरही  सादर करता आलं नाही, असा मिश्किल टोला कोर्टाने लगावला.

  • तुमचं जे म्हणणं राज्यपालांसमोर मांडायला हवं होतं, ते कोर्टासमोर मांडत आहात. तुम्ही कोर्टात येण्यापूर्वी राज्यपालांकडे म्हणणं मांडणं आवश्यक होतं.

  • तुम्ही राज्यपालांकडेही तुम्हाला पाठिंबा असलेल्या आमदारांबाबत किंवा संख्याबळाबाबत काहीही सांगितलं नाही आणि आता तुम्ही कोर्टाला म्हणता, हा गुंता सोडवा.


सुप्रीम कोर्ट भाजपला काय म्हणालं?

भाजप हे पॉवरफुल्ल आहे, ते काहीही करु शकतात, असं काँग्रेस म्हणतंय, असं कोर्टाने भाजपचे वकील हरिष साळवे यांना सांगितलं.  तसंच सुनावणी दरम्यान कोर्ट बहुमताबाबतचे आदेश देऊ शकतं का अशी विचारणा केली. त्यावर साळवेंनी नाही असं सांगितलं.

त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने शपथविधीला स्थगिती न देता, बहुमत सिद्ध करण्याचा अवधी 15 दिवसांवरुन 2 दिवसांवर आणला.

गोव्यात कुणाला किती जागा?

दरम्यान, काँग्रेस आमदारही आज राज्यपालांना भेटून बहुमताचा दावा करणार आहेत.  एकूण 40 जागांपैकी 17 जागा जिंकत गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मात्र 13 जागा जिंकणाऱ्या भाजपनं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (3), गोवा फॉरवर्ड पक्ष (3), राष्ट्रवादी (1) आणि अपक्षाच्या (3) साथीनं बहुमताचा दावा केलाय. त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मनोहर पर्रिकर मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेणार आहेत.

संबंधित बातम्या

गोव्यानंतर मणिपूरही काँग्रेसच्या हातातून निसटलं?

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर… अडीच वर्षात 40 वर्षांचं काम !

गोव्यात भाजपचा सरकार स्थापनेचा दावा, काँग्रेस सुप्रीम कोर्टात

पर्रिकरांचा राजीनामा, अरुण जेटली पुन्हा संरक्षण मंत्री!

गोव्यात भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना मंत्रिपदं : सूत्र

गोव्यात शिवसेनेचा दारुण पराभव, तीन उमेदवारांना एकूण 792 मतं

भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं, गोवा मात्र गमावलं

गोव्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सहा मंत्र्यांचा पराभव