Supreme Court News : एखाद्या व्यक्तीने केलेल्या दुखापतीमुळे पीडित व्यक्तीचा दीर्घ कालावधीनंतर मृत्यू झाल्यास खून प्रकरणातील आरोपीची जबाबदारी कमी होत नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने नोंदवलं. छत्तीसगड उच्च न्यायालयाने अपीलकर्त्यांना एका प्रकरणात हत्येच्या आरोपात दोषी ठरवलं होतं. त्यानंतर अपीलकर्त्यांनी या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. दोषींच्या या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
सुनावणीदरम्यान, अपीलकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं की, हल्ल्याच्या 20 दिवसांनंतर पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यावरुन असं दिसून येतं की हल्ल्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला नाही.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2012 मध्ये वादग्रस्त जमीन जेसीबीने सपाट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींनी पीडित व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. यानंतर काही दिवसात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांकडून अपीलकर्त्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर छत्तीसगड उच्च न्यायालयाने अपीलकर्त्यांना हत्येसाठी दोषी ठरवलं होतं. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला अपीलकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
आरोपींच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की पीडित व्यक्तीचा मृत्यू कथित घटनेच्या सुमारे 20 दिवसांनंतर झाला. त्याचा मृत्यू कथित हल्ल्यामुळे नव्हे तर शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे झाला.
सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
यावर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, अपीलकर्ते हल्लेखोर होते, त्यांनी पीडितेवर कुऱ्हाडीने हल्ला केला हे मान्य करण्यात या न्यायालयाला कोणतीही अडचण दिसत नाही. कोर्टाने असंही म्हटलं की पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की मजबूत आणि तीक्ष्ण वस्तूमुळे जखमा झाल्या आहेत आणि मृताचा मृत्यू हृदय-श्वसनक्रिया निकामी झाल्यामुळे झाला आहे. त्याच्या शरीरावर झालेल्या जखमांमुळे शरीराच्या क्रिया बंद पडल्या.
अचानक झालेल्या भांडणामुळे अनावधानाने मृत्यू झाला हा अपीलकर्त्यांचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला नाही. न्यायालयाने म्हटलं की, "अपीलकर्त्यांकडे कुऱ्हाड होती, ज्यामुळे मृत व्यक्तीला हानी पोहोचवण्याचा त्यांचा हेतू दर्शवते."
सुप्रीम कोर्टाकडून छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत, खंडपीठाने असं निरीक्षण नोंदवलं की, "दोन प्रत्यक्षदर्शींच्या, साक्षीदारांच्या जबाबावरुन हे सिद्ध झालं आहे की मृत व्यक्ती त्याच्या मालमत्तेवर सेप्टिक टँक सपाट करत असताना आरोपी/अपीलकर्त्यांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांना रोखलं असताना मात्र बाजूच्या भिंतीवरुन चढून पीडित व्यक्तीच्या घरात घुसले आणि त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान 20 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला."