नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च वादाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र आज हा वाद सुटण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे चारही न्यायमूर्तींशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

खरंतर शनिवारीच चारही मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र न्या. कुरियन जोसेफ, न्या. मदन लोकूर आणि न्या. रंजन गोगोई हे दिल्लीबाहेर होते. आज संध्याकाळपर्यंत तिघेही दिल्लीत परतणार आहेत. त्यामुळे संध्याकाळी सरन्यायाधीश दीपक मिश्रांशी त्यांची चर्चा होऊ शकते.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या चारपैकी दोन न्यायमूर्तींनी काल मौन सोडलं आणि वाद सुटण्याचे संकेत दिले.

केरळमध्ये न्या. कुरियन जोसेफ यांनी म्हटले, “आम्ही एक मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर उपाय नक्की सापडेल. कुठलाही असा मुद्दा नाही, ज्यासाठी बाहेरील मध्यस्थाची गरज भासेल. न्यायव्यवस्थेचं हे अंतर्गत प्रकरण आहे आणि ते सुटेलही. न्यायसंस्थेत सुधारणांची गरज आहे. न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढायला हवा. त्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले होते. आम्हाला आशा आहे की, सुप्रीम कोर्ट प्रशासनात अधिक पारदर्शकता येईल.”

केंद्र सरकारही जरी हे न्यायव्यवस्थेचं अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हणत असलं, तरी काल पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव नृपेद्र मिश्र अचानक सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या घरी पोहोचले. मात्र दीपक मिश्रा यांची भेट झाली नाही. त्यामुळे ते तसेच परतले. काँग्रेससह अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले.

 काय आहे प्रकरण?

भारताच्या इतिहासात अशी वेळ कधीही आली नाही, जेव्हा न्यायमूर्तींना पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त करावी लागली असेल. सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी (जे.चल्मेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ) यांनी मुख्य न्यायमूर्तींवर गंभीर आरोप केले.

न्यायमूर्ती म्हणाले की, “पत्रकार परिषद बोलावताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून न्यायव्यवस्थेत जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारं आहे. सुप्रीम कोर्ट प्रशासनाचं कामकाज सुरळीत होत नाही. याबाबत आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्रही लिहिलं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरन्यायाधीशांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करणार आहोत. आम्ही आमचा आत्मा विकला, असं आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये. न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही.”

वरिष्ठ न्यायमूर्ती चलमेश्वर यांनी सांगितलं की, “न्यायालयातील अनियमिततेसंदर्भात आम्ही वारंवार सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर आपापली मतं मांडली. पण त्यांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही.”

संबंधित बातम्या :

देशात आणीबाणी सदृष्य परिस्थिती : यशवंत सिन्हा

सीपीआय खासदार डी. राजांची न्यायमूर्ती चेलमेश्वरांशी भेट

देशातील लोकशाही धोक्यात, न्यायमूर्तींच्या प्रकरणावरुन राहुल गांधींचं वक्तव्य

या एका केसमुळे न्यायमूर्तींच्या असंतोषाचा कडेलोट झाला

सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधानांची कायदेमंत्र्यांशी चर्चा

सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता

सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?

सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील

न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?