नवी दिल्ली : अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारनं घोषित केल्याप्रमाणे 1 फेब्रुवारीलाच बजेट सादर होणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यास मतदार प्रभावित होतील, त्यामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात यावा, या आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र त्याबाबतचे स्पष्टीकरण याचिकाकर्त्याला देता आलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली.
चार फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेश, पंजाबसह देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. तेव्हा एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला तर त्यात राज्यांबाबत घोषणांचा पाऊस पडेल आणि तेथील मतदारांवर परिणाम होईल असं काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या पक्षांनी म्हटलं होतं. याविरोधात तृणमूलने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.