मुझ्झफ्फरनगर (उत्तर प्रदेश): मुझ्झफ्फरनगर पोलीसांचा एका अविभाज्य घटक असलेल्या टिंकी या आठ वर्षाच्या श्वानाचा मृत्यू झाला आहे. गेले काही दिवस तिची तब्येत खूपच खालावली होती आणि तिची काळजी घ्यायला मुझ्झफ्फरनगर पोलीस सक्षम नव्हते. काही दिवसानंतर तिच्या पोटाच्या विकाराने उग्र रुप धारण केले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. मंगळवारी मुझ्झफ्फरनगर पोलीसांनी टिंकीचे अंतिम संस्कार पार पाडले. त्यापूर्वी तिला मानवंदना दिली.
टिंकीने 2014 मध्ये कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात काम सुरु केल्यानंतर आपल्या कामाने अनेकांची मने जिंकली. आपल्या कामाबाबत सजग असलेल्या टिंकीने तब्बल 47 अशा गुन्हांचा छडा लावला ज्यांचा शोध लावणे पोलीसांसाठी जवळपास अशक्यप्राय झालं होतं. कसलाही सुगावा मिळत नसलेल्या अशा गुन्ह्यांना ब्लाईंड क्राईम म्हणतात, अशा ब्लाईंड क्राईमची उकल करण्यात तिचा हातखंडा होता. अशा प्रकारच्या अप्रतिम कामगिरीमुळे टिंकीला केवळ 6 वर्षातच 6 प्रमोशन मिळाली होती आणि या जोरावर तिने अतिरिक्त एसपी अर्थात अतिरिक्त पोलिस अधिक्षकपदापर्यंत मजल मारली होती
ज्या गुन्हात काहीच पुरावा हाती लागत नाही, ज्याचा तपास पोलीसांच्यासाठी अशक्यप्राय होत होता अशा तपासामध्ये टिंकीने आपले कौशल्य लावले आणि त्या प्रकरणांचा छडा लावला. जेव्हा जेव्हा पोलीसांच्या कौशल्याचा प्रश्न निर्माण होत होता त्यावेळी टिंकीने तिच्या अफाट बुद्धीकौशल्याने अनेकांना आश्चर्यचकित केलं होतं.
ग्वाल्हेर येथील बीएसएफच्या नॅशनल डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत असलेली टिंकी ही जर्मन शेफर्ड श्वान मुझ्झफ्फरनगर पोलीस व्यवस्थेचा एक भाग बनली. स्निफर डॉग म्हणून तिला पहिली पोस्टिंग मिळाली. मुझ्झफ्फरनगरचे एसएसपी अभिषेक यादव तिच्याबाबत बोलताना म्हणाले की, "टिंकी ही अत्यंत हुशार, धाडसी आणि चाणाक्ष होती. तिने आतापर्यंत अशक्यप्राय अशा 47 प्रकरणांचा छडा लावला आहे. मंगळवारी मुझ्झफ्फरनगर पोलीसांनी टिंकीच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात आपल्या आवडत्या सदस्याला शेवटचा निरोप दिला."
"टिंकीने आतापर्यंत ज्या खून, चोरी आणि दरोड्यांच्या प्रकरणांचा तपास केला, ती प्रकरणे उघडकीस आणणे अत्यंत अवघड अशी होती. अशाच एका प्रकरणात एक व्यक्ती दहा दिवसांपासून बेपत्ता होती. त्याचा माग काढण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. त्यावेळी टिंकीने तिचे सर्व कौशल्य पणाला लावून त्या व्यक्तीचा मार्ग काढला. त्या ठिकाणी तो व्यक्ती मृत अवस्थेत सापडला होता" असेही एसएसपी यादव यांनी सांगितले.
टिंकीला पोटाचा विकार जडल्यापासून तिच्यावर मेरठ व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तेव्हापासूनच तिची काळजी घेणारे कॉन्स्टेबल महेश कुमार हे तिच्या प्रकृतीबद्दल काळजीत होते. सोमवारी रात्री त्यांना ज्यावेळी समजले की टिंकी आता बरी होऊ शकत नाही त्यावेळी महेश कुमारांना अश्रू अनावर झाले. "मी तिच्यासोबत गेली 6 वर्षे काम करतोय, तिची काळजी घेतोय. कामाव्यतिरिक्त तिचे वागणे हे मैत्रीपूर्ण होते. तिला लहान मुलांसोबत खेळायला खूप आवडायचे" असे महेश कुमारा यांनी सांगितलं.