नवी दिल्ली : उत्तराखंड (uttarakhand glacier collapse) येथे पुन्हा एकदा एका आपत्तीमुळं हाहाकार माजल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी सकाळी अकरा वाजण्याचा सुमारास उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळला. हा अपघात इतका मोठा होता, की त्यामुळं तपोवन वीजप्रकल्प वाहून गेला आहे. शिवाय यामघ्ये 150 हून अधिकजण वाहून गेल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, देशात आलेलं हे संकट पाहता सर्वच मंत्री आणि शासकीय यंत्रणांनी त्याकडे लक्ष केंद्रीत केलं असून घटनास्थळी शक्य त्या सर्व परिंनी मदत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सदर घटनेचा आढावा घेत दुर्घटनाग्रस्तांसाठी प्रार्थना केल्या आहेत.
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पाणी पातळी वाढल्याने अनेकजण वाहून गेल्याची भीती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे या घटनेबाबतची माहिती देत, आपण उत्तराखंडचा सातत्यानं आढावा घेत असल्याचं सांगितलं. शिवाय सारा देश या संकटाच्या वेळी उत्तराखंडसोबत उभा असून, सध्या तिथं असणाऱ्यांच्या सोबत आपल्या प्रार्थना असल्याचंही त्यांनी लिहिलं. खुद्द पंतप्रधान या घटनास्थळी सुरु असणाऱ्या बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत हे त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट झालं.
एनडीआरएफच्या टीम दिल्लीहून रवाना
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड दुर्घटनेचं गांभीर्य आणि एकंदर स्वरुप पाहता इथं एनडीआरएफच्या टीम दिल्लीहून बचावकार्यासाठी रवाना झाल्या आहेत. शिवाय आपण स्वत: या परिस्थितीवर वेळोवेळी लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं. उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्त भागामध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आली असून, इथं शक्य त्या सर्व परिंनी मदतीचा ओघ पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
किनारी भागात सतर्कतेचा इशारा
उत्तराखंडमध्ये आलेलं हे भीषण संकट पाहता चमोली जिल्ह्यातील नद्यांच्या काठी असणाऱ्या वस्त्या आणि गावांमध्ये सतर्तकेचा इशारा देण्यात आला आहे. इथं पोलीस यंत्रणा लाऊडस्पीकरच्या सहाय्यानं सावधगिरीचा इशारा देत आहेत. गंगा आणि तिच्या उपनद्यांमध्येही पूराचा धोका असल्यामुळं आता युद्धपातळीवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचही येत आहे.