भुवनेश्वर : लग्नानंतर वधुच्या प्रियकराचं लपून छपून तिच्या घरी येणं आणि अखेरीस दोघांचं लग्न होणं हे सिनेमातील चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिलं असेल. पण ओदिशाच्या राऊरकेला जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरुणाने लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांनंतर स्वत:च्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिलं आणि धूमधडाक्यात तिची पाठवणी केली.


सुंदरगड जिल्हाच्या बडगाव ब्लॉकच्या पमारा गावात हे अनोखं लग्न पार पडलं. या गावात राहणाऱ्या 28 वर्षीय वासुदेव टप्पूचं लग्न झारसुगुडाच्या देविनी गावात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीशी 4 मार्च रोजी झालं होतं.

पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला. लग्नानंतर काही दिवसांनी टप्पूच्या घरी 3 तरुण आले होते. त्यापैकी एकाने आपण टप्पूच्या पत्नीचा चुलत भाऊ असल्याचं सांगितलं. या तरुणांचं घरात चांगलं स्वागतही झालं. यानंतर दोन तरुण वासुदेवसोबत गाव पाहण्यासाठी गेले. पण कथित चुलत भाऊ घरातच थांबला. गावकऱ्यांनी त्याला टप्पूच्या पत्नीसोबत पाहिलं.

मनाविरोधात लग्न
काही वेळाने गावकरी त्याच्या घरी पोहोचले आणि तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर नववधु समोर आली, हा तरुण चुलत भाऊ नाही प्रियकर असल्याचं तिने सांगितलं. "दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, पण कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. माझ्या मनाविरोधात लग्न केलं," असंही ती म्हणाली. तीन भाऊ-बहिणींमध्ये ती सर्वात लहान आहे. तसंच तिला आई-वडील नाहीत.

यानंतर वासुदेव टप्पूने आपल्या पत्नीला प्रियकराशी लग्न करण्यास सांगितलं. यानंतर त्याने पत्नीचा मोठा भाऊ-बहिण आणि प्रियकराच्या पालकांशी बातचीत करुन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. शनिवारी हे सगळे जण पमारा गावात आले आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीत या प्रेमी युगुलाचं लग्न झालं. "मी असं केलं नसतं, तर तीन लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आता आम्ही सगळे आनंदात आहोत," असं वासुदेव टप्पू म्हणाला.

टप्पूच्या या निर्णयाचं प्रत्येक जण कौतुक करत आहे. "आम्ही वासुदेवचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही," असं त्याच्या पत्नीने सांगितलं. पमारा गावाचे सरपंच गजेंद्र बाग म्हणाले की, "जेव्हा आम्हाला वासुदेवच्या या निर्णयाबाबत समजलं, तेव्हा यापेक्षा चांगलं आणखी काहीही असू शकत नाही, असं मला वाटलं. त्यामुळेच संपूर्ण गावाने त्याच्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाला पाठिंबा दिला."