मुंबई: भाजप कार्यकर्त्याकडून राहुल गांधींविरोधात मानहानीचा आणखी एक खटला दाखल करण्यात आला आहे. राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप करत राहुल गांधींविरोधात हा मानहानीचा खटला दाखल झाला आहे. या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरु करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून त्याबाबत राहुल गांधींना समन्स बजावत 3 ऑक्टोबरला कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.


राहुल गांधी यांनी राफेलबाबत टीका करताना मोदी यांच्यावर 'कमांडर इन थीफ', 'चौकीदार चोर है', 'चोरो का सरदार'अशी टीका केली होती. त्यामुळे मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टी व त्यातील सदस्यांचीही प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमाळ यांनी ही याचिका दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या विधानांमध्ये या याचिकेत समावेश आहे.



तक्रारदार हे भाजपचे सदस्य असल्यामुळे ते अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना आहे, असं मत व्यक्त करत या कोर्टानं हे समन्स जारी केलं आहे. या दाव्यावर पुढील सुनावणी 3 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. गांधी यांच्याविरोधात याशिवाय भिवंडी आणि शिवडी न्यायालयातही मानहानीच्या तक्रारी प्रलंबित आहेत.

20 सप्टेंबर 2018 रोजी जयपूरच्या एका सभेत राहुल गांधींनी, "गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है" असा नारा दिला होता. तसंच 24 सप्टेंबरला एक ट्वीट करुन राहुल गांधींनी मोदींना उद्देशून अपमानकारक, मानहानीकारक विधानं केली होती. ज्यामुळे तमाम भारतीयांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन झाल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींच्याबाबतीत अशी विधानं करुन राहुल गांधींनी भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांचाही अपमान केला आहे. असा दावा या याचिकेतून करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.