Summer Solstice 2021 : भारतात 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. वर्षातील सर्वात मोठ्या दिवसासोबतच 21 जून रोजी रात्र ही सर्वात लहान असते. आजच्या दिवशी सूर्यकिरण पृथ्वीवर बर्‍याच काळ पडतात. सूर्याचे किरण पृथ्वीवर सुमारे 15 ते 16 तास राहतात. म्हणूनच आजचा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवसाला 'Summer Solstice' असं देखील म्हटलं जातं. पण हे असं का होतं हे जरा वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊयात.


आजचा दिवस मोठा असण्याचे कारण?


21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असण्याचे कारण म्हणजे 21 जून रोजी सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असतो. त्यामुळे पृथ्वीचा उत्तर धृव हा 21 जूनच्या दिवशी सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कोनामध्ये कललेला असतो. यादिवशी सूर्य कर्कवृत्तात थेट डोक्यावर येतो आणि यामुळेच पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो. त्यामुळे आजच्या दिवशी उत्तर गोलार्धात असणाऱ्या सर्वच देशांमध्ये आजच्या दिवशी दिवस सर्वात मोठा आणि रात्र सर्वात लहान असते. आतापर्यंत फक्त एकदा 1975 रोजी 22 जूनला सर्वात मोठा दिवस होता. त्यानंतर हे 2203 ला होणार आहे. 


नासाच्या माहितीनुसार, आजच्या दिवशी सूर्यापासून सर्वाधिक उर्जा मिळते, जी 30 टक्के अधिक असते. उत्तर गोलार्धात 20, 21, 22 जून रोजी सर्वाधिक उर्जा मिळते. तर दक्षिण गोलार्धात 21, 22, 23 डिसेंबर रोजी सूर्यापासून सर्वाधिक उर्जा मिळते.  


21 जून हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात दिवसाचा कालवधी वेगळा असतो. काही ठिकाणी 13 तासांहून अधिक काळ सूर्यप्रकाश राहतो. आजच्या दिवसाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे, आजपासून बऱ्याच देशांमध्ये ऋतूबदल होतो. पश्चिमेतल्या देशांमध्ये 21 जूनच्या दिवशी वसंत ऋतू संपतो आणि उन्हाळा सुरू होतो.