सुकमा : देश कोरोनाच्या महामारीशी सामना करत असताना नक्षलवाद्यांनी आपला डाव साधत छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला केला आहे. सुकमामध्ये नक्षल्यांच्या हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत तर 14 जवान जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी सुकमामधील चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला. हे जवान शोध मोहिमेवरुन परतत होते. या हल्ल्यात 17 जवान शहीद झाले. यातील 12 जवान डीआरजीचे तर 5 जवान हे एसटीएफचे असल्याची माहिती आहे. यापैकी जखमींना शनिवारी रात्री उशीरा या जखमी जवानांना एअरलिफ्ट करुन रायपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. सुमारे 300 डीएआरजी आणि एसटीएफचे जवान या भागात एका कामगिरीवर निघाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास नक्षलवाद्यांनी जवानांना घेरले. त्यानंतर नक्षली आणि जवानांमध्ये तब्बल तीन तास ही चकमक सुरु होती. यानंतर नक्षलवादी इथून पळून गेले. घनदाट जंगल आणि वातावरणाची स्थिती खराब असल्याने या जवानांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. ड्रोनच्या मदतीने जवानांचा शोध घेतला जात होता.
दरम्यान, शनिवारी रात्री डीजीपी डीएम एवस्थी यांनी मुख्यंत्री भूपेश बघेल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेबाबत माहिती दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.
सुत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षारक्षकांच्या टीमला नक्षलवाद्यांचा म्होरक्या हिडमा याच्या कॅम्पची माहिती मिळाली होती. यानंतर त्याच्या शोधासाठी हे जवान निघाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलिसांनी 4 ते 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं असल्याची देखील माहिती आहे. हे नक्षलवादी बुलेट प्रुफ जॅकेट घालून आले होते. हिडमा देखील या चकमकीत जखमी झाला असल्याची माहिती आहे.
Sukma Naxalite encounter | नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, छत्तीसगडच्या सुकमामध्ये 17 जवान शहीद, 14 जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2020 06:46 PM (IST)
नक्षली आणि जवानांमध्ये तब्बल तीन तास ही चकमक सुरु होती. यानंतर नक्षलवादी इथून पळून गेले. घनदाट जंगल आणि वातावरणाची स्थिती खराब असल्याने या जवानांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. ड्रोनच्या मदतीने जवानांचा शोध घेतला जात होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -