ठाणे : योगी सरकारने पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरीप्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर, उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दल आणि ठाणे गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत दोन उच्चशिक्षित तरुणांना अटक केली आहे. हे दोघेही पेट्रोल पंपचालकांसाठी पेट्रोल चोरीत वापरण्यात येणारी चीप, रिमोट आणि सॉफ्टवेअर तयार करत होते.


यामध्ये पोलिसांनी इंजिनिअर विवेक शेट्टे याला ठाण्यातून, तर अविनाश नाईक या तरुणाला पुण्यातून अटक केली आहे. यातील विवेक पेट्रोल चोरीसाठी चीप तयार करायचं काम करायचा, तर अविनाश रिमोट तयार करत असे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी पेट्रोल पंपावर छापे टाकून पेट्रोल चोरीचा गोरखधंदा उजेडात आणला. याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलानं अजय चौरसिया नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. चौरसिया पेट्रोल चोरीसाठी चीप पुरवण्याचं काम करत होता. यासाठी तो पेट्रोलपंप चालकांकडून  30 हजार रुपये घेत असे. यातील निम्मे पैसे तो विवेक आणि अविनाशला देत होता. तर उर्वरित रक्कम स्वत: कडे ठेवत होता.

विशेष म्हणजे, या चीप वापरासाठी पेट्रोलपंप चालक चौरसियाला महिना तीन हजार रुपये भाडे ही देत होते. या चीप आणि रिमोटच्या माध्यमातून पेट्रोल पंपचालकांनी तब्बल 10 ते 14 लाखांचं पट्रोल वाचवलं होतं.

याप्रकरणी दोघांनाही अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या दोघांनी पेट्रोल चोरीसाठी एक सॉफ्टवेअरही विकसित केलं असल्याचं आता समोर आलं आहे. यात पट्रोल वेंडिंग मशीनला काही प्रोग्राम देऊन दिवसभरात ही पेट्रोल चोरी केली जात होती.

दरम्यान, या दोघांना अटक केल्यानंतर देशभरातील किती पेट्रोल पंप चालकांना त्यांनी चीप आणि रिमोट पुरवला आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.