Sukesh Chandrasekhar : राजधानी दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीतील रोहिणी जेलमधील 81 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या हवाल्याने रविवारी ही माहिती देण्यात आली आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरकडून लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची बाब समोर येत आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने 8 तुरुंग कर्मचाऱ्यांना अटक केली होती.


जेलमधील कर्मचाऱ्यांवर महिन्याला दीड कोटींची उधळण


सुकेश दर महिन्याला दीड कोटी रुपये जेलमधील कर्मचाऱ्यांवर उधळत असल्याचे समोर आले आहे. बदल्यात त्याला जेलमध्ये मोबाईल वापरणे, वेगळ्या कोठडीत राहणे यासह अन्य सुविधा मिळत होत्या. पोलिसांना एक चिठ्ठी देखील मिळाली आहे, ज्यात लाच घेणाऱ्या सर्व तुरुंग कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या संपूर्ण प्रकरणात तिहार जेल प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सुकेश बऱ्याच दिवसांपासून चर्चेत


200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर हा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याप्रकरणी तिहार तुरुंगातील एका जेलरला अलीकडेच अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तिहार जेलच्या  जेलरला अटक केली होती, प्रकाश चंद असे आरोपीचे नाव आहे. जे 2019 ते 2021 पर्यंत रोहिणी जेलमध्ये सहाय्यक अधीक्षक म्हणून तैनात होते.


जेलर प्रकाश चंद यांच्यावर ठग सुकेश चंद्रशेखरला मदत केल्याचा आरोप आहे. आरोपी प्रकाश चंद तिहारच्या तुरुंग क्रमांक 2 मध्ये सहायक अधीक्षक म्हणून तैनात होते. सुकेश चंद्रशेखर वयाच्या 17 व्या वर्षापासून लोकांना फसवू लागला. सुकेश चंद्रशेखरवर तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपयांचे खंडणी रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. एका राजकारण्याचा नातेवाईक म्हणून सुकेशने 100 हून अधिक लोकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या