Amarnath Yatra : अमरनाथ गुहेजवळ (Amarnath Cave) झालेल्या ढगफुटीमुळे आतापर्यंत तब्बल 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 65 लोक वाचवण्यात यश आलं असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अद्याप 41 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. बचावकार्य सुरु असून खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आज तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, आज देखील हवामान खराब असल्यानं अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. 


शुक्रवारी संध्याकाळी अमरनाथमध्ये ढगफुटी झाल्यामुळे पूर आला. यात्रेसाठी गेलेले असंख्य लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. मृतांची संख्या वाढून 16 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 7 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. तर आणखी 2 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या घटनेत जवळपास 65 जण जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 


सांगलीतील 47 जणांचा ग्रुप अमरनाथजवळ अडकला 


अमरनाथ यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातील 47 जणांचा ग्रुप गेला होता. अमरनाथ गुहेखाली असलेल्या तंबुमध्ये ते मुक्कामास होते. हा ग्रुप दर्शनासाठी गेला आणि अचानक ढगफुटी होऊन त्यांचे तबु गाडले गेले. दैव बलवत्त म्हणून ते बचावले मात्र त्यांचं सगळं साहित्य गाडलं गेलं. काही मिनिटांसाठी ते तंबुच्या बाहेर गेल्यानं त्यांचा जीव वाचला. त्या दुर्घटनेनंतर अजुनही ते धक्क्यात आहेत. आर्मीनं त्यांचे फोन आणि काही साहित्य शोधुन काढलं आहे. मात्र आजही हवामान खराब असल्यानं त्यांचं साहित्य वरती अडकलंय आणि हे लोक बेस कॅम्पला आले आहेत. आज देखील हवामान खराब असल्यानं अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. 


दरम्यान, घटनास्थळी एनडीआरएफचे (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि बचाव पथकाच्या तुकड्या तैनात असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे पूर आला आणि पुराच्या तडाख्यात अनेक तंबू वाहून गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. यंदा  30 जूनपासून ही यात्रा सुरू झाली होती. 43 दिवस चालणाऱ्या या यात्रेची 11 ऑगस्ट रोजी सांगता होणार होती. पण सध्या खराब हवामानामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे.