Success Story : तुम्ही जर दगड विकायचा ठरवला तर दगडही विकता येतो, पण त्यासाठी तुमच्या ते विकण्याचं कौशल्य असायला हवं. जगात जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर खूप साऱ्या कल्पना असतात. काही मंडळी तर अशीही असतात जी भंगार विकूनही व्यवसायात चांगला नफा कमावतात. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही परंतू इलेक्ट्रॉनिक कचरा विकून एका उच्चशिक्षित तरुणांनी कोट्यवधींचा नफा कमावला आहे. एमबीए पदवी घेतलेल्या दोन मित्रांनी जुने मोबाईल विकण्याचा व्यवसाय सुरु केला आणि त्यातून त्यांनी तब्बल 200 कोटी रुपयांची कंपनी सुरु केली आहे.


साकेत सौरव आणि अवनीत सिंह या दोन मित्रांनी 2017 मध्ये स्टार्टअप सुरु केलं आणि अवघ्या 5 वर्षांत या दोघांनी आकाशाला गवसणी घातली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


कंपनीची सुरुवात कशी झाली?


साकेतनं 2011 साली इंटरनॅशनल स्कुल ऑफ बिझनेस अँण्ड मीडिया या संस्थेतून मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर अनेक नामांकित कंपन्यांमध्ये सौरवने नोकरी करुन अनुभव घेतला. पण 6 वर्षानंतर म्हणजेच 2017 साली साकेतनं आपल्या मित्रासमवेत जुने फोन विकण्याचं ठरवलं. याकरिता त्यांनी रीफिट ग्लोबल हा प्लॅटफॉर्म उभा केला. 


या माध्यमातून आपलं वितरण प्रणाली (डिस्ट्रीब्युशन चॅनेल) सुरु केलं. या रीफिट ग्लोबलद्वारे जुने फोन आणि त्याच्याशी निगडीत काही इलेक्ट्रॉनिक वस्तू विकायला साकेत आणि अवनीतने सुरुवात केली. इथूनच त्यांना यशाचा मार्ग सापडला आणि व्यवसायात त्यांची वृद्धी झाली.


बिझनेसची आयडियाची कल्पना?


या व्यवसायामधली खास गोष्ट म्हणजे साकेत आणि त्याच्या मित्राला पहिल्या वर्षापासूनच जुने मोबाईल विकण्यापासून नफा मिळायला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी कंपनीचा महसुल 8 कोटी झाला, मग 19 कोटी, त्यानंतर 24 कोटी मग 44 कोटी इतका गेला. आर्थिक वर्ष 2011-12 मध्ये कंपनीची उलाढाल 100 कोटींच्या पार केली आणि गेल्या आर्थिक वर्षात याच कंपनीने एक भरीव आकडा 200 कोटींचा गाठला.


यॉर स्टोरीने दिलेल्या बातमीनुसार, रिफिट ग्लोबल या त्यांच्या कंपनीनं फ्लिपकार्ट, अमेझॉन, ओप्पो, श्याओमी आणि व्हीवो या कंपन्यांवरती नवीन फोन खरेदी करताना जे जुने फोन एक्सचेंज केले जातात ते फोन खरेदी करण्याचा सपाटा लावला. या जुन्या मोबाईलमध्ये काही तांत्रिक आणि लुकशी संबंधित कुठली गोष्ट असेल तर ती दुरुस्त केली जाते, फोन पूर्णपणे चेक करतात आणि मग रिफिट ग्लोबलच्या माध्यमातून हे फोन वितरणासाठी पाठवून त्यांची विक्री केली जाते


फोनसह इतर गॅजेटची विक्री


रिफिट ग्लोबल प्रत्येक मोबाईल फोन 37 पॉइंटच्या क्वालिटीवर चेक करतात आणि फोन वापरण्यासाठी पूर्णपणे फिट असल्याचे घोषित केल्यानंतरच या फोनची विक्री केली जाते. मोबाईलच्या व्यतिरिक्त अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेटची विक्री केली जाते, शिवाय काही गॅजेट दुरुस्त करुन त्याचीही विक्री ही कंपनी करते. या कंपनीचे 80 टक्के फोन फ्लिपकार्टवर विकले जातात तर इतर ई-सेलर्सच्या माध्यमातून 20 टक्के विक्री होते.  


कंपनीचा नफा


गेल्या वर्षी साकेत आणि त्याच्या मित्रांनी 5 लाख जुने मोबाईल फोन विकले. साकेत सौरवनं दिलेल्या माहितनुसार, ते विकत असलेले फोन हे नवीन मोबाईलच्या तुलनेत 70 टक्के स्वस्त असतात. प्रामुख्याने जुन्या वस्तू विकणाऱ्या दुकानदांना हे जुने फोन विकले जातात आणि हेच फोन मग दुकानदार ग्राहकांना विकतात. चालू आर्थिक वर्षात या मित्रांनी 350 कोटी रुपयांचा महसुल अपेक्षित आहे.