मुंबई : पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात उद्योगपती रतन टाटा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत एकाच मंचावर दिसतील, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलं आहे. याअगोदर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या मंचावर गेल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता.

‘नाना पालकर स्मृती समितीने 24 ऑगस्टला आयोजित केलेल्या कार्यक्रमात रतन टाटा आणि मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. ही समिती टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सर पीडित रुग्णांना मदत करते,’ अशी माहिती संघाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.

‘नाना पालकर स्मृती समिती करत असलेल्या कामाबद्दल रतन टाटा यांना माहिती आहे,’असंही संघाचा पदाधिकारी म्हणाला.

‘रतन टाटा जर या कार्यक्रमाला जाणार असतील तर तो त्यांचा वैयक्तिय विषय आहे,’ असं म्हणत टाटा ट्रस्टच्या प्रवक्त्याने या कार्यक्रमाबद्दल बोलण्यास नकार दिला.

‘आमच्या समितीचे संस्थापक नाना पालकर यांचे शताब्दी वर्ष आहे, तसंच आमच्या संघटनेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आम्ही रतन टाटांशी संपर्क केला आहे. पण त्यांनी अजूनही आमचं निमंत्रण स्वीकारलं नाही आणि नकारही दिलेला नाही. यामुळे आम्ही आशावादी आहोत,’ असं नाना पालकर स्मृती समितीच्या एका सचिवाने सांगितलं आहे.

रतन टाटांची  2016 साली संघ मुख्यालयाला भेट

आपल्या 79 व्या वाढदिवसादिवशी रतन टाटांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. ही शिष्टाचार भेट आहे, असं त्यावेळी टाटांच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रणव मुखर्जी संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यावेळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रणवदांच्या निर्णयावर नाराजी दर्शवली होती. संघाच्या या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींनी राष्ट्र आणि राष्ट्रवाद याविषयीचे आपले विचार स्पष्ट केले होते.