नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी जर्मनीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जर्मनीतील ब्रेमेन येथे राज्यशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या राहुल वाघ या विद्यार्थ्याने राहुल गांधी यांच्याशी काही सेकंदाचा संवाद साधला. हा अनुभव राहुलने आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे.
राहुल गांधी समोर आल्यानंतर कमी वेळात आपली ओळख सांगण्यासाठी राहुलने सांगितलं की, "मी भारतातून आलो असून ब्रेमेन येथे राज्यशास्त्राचं शिक्षण घेत आहे. मी महाराष्ट्रातील लातूरशेजारील बीडचा रहिवाशी आहे."
त्यावेळी थोडाही विलंब न करता राहुल गांधी म्हणाले की, "अच्छा तुम्ही रजनीजी (रजनी पाटील) यांच्या जिल्ह्यातून आहात. चांगला अभ्यास करा आणि देशाचं नाव मोठं करा." रजनी पाटील बीडमधून काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंतग विलासराव देशमुख यांच्यामुळे मुद्दाम लातूर जिल्ह्याचा उल्लेख केल्याचं राहुलने सांगितलं. मात्र राहुल गांधींना बीड माहीत होतं हे ऐकूण मला आश्चर्याचा धक्का बसल्याचं राहुल वाघने सांगितलं.
राहुल वाघने पुढे म्हटलं की, राहुल गांधी अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहेत. युरोपियन पॉलिटिक्स प्रभाव राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्वावर दिसतो. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास एक तासाच्या भाषणात दिसून आलं.
"हिंसेचे उत्तर मी अहिंसेनेच देणार, मग काही असो. कारण तीच आमची शिकवण अन परंपरा आहे, हे राहुल गांधी यांचं वाक्य आपल्या भावल्याचंही राहुल वाघने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.