नवी दिल्ली: दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाचं नाव बदलून, अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव उत्तर दिल्ली महापालिकेतील भाजपच्या 5 नगरसेवकांनी दिला आहे. या प्रस्तावावरुन आता राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत, भाजपला पंतप्रधान मोदींचंच नाव बदलण्याची गरज आहे, तरच त्यांना मतं मिळतील, असं म्हटलं आहे.
केजरीवालांचं ट्विट
“रामलीला मैदान इत्यादीचं नाव बदलून अटलजींचं नाव दिल्याने मतं मिळणार नाहीत. भाजपला पंतप्रधानांचं नाव बदलावं लागेल. तेव्हा कुठे मतं मिळतील. कारण त्यांच्या नावे तर लोक आत मतं देत नाहीत”, असं केजरीवालांना म्हटलं आहे.
दुसरीकडे आप नेत्या अलका लांबा यांनीही भाजपला धारेवर धरलं. “अटल बिहारी वाजपेयी हे काय रामापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल विचारत, भक्तांना कळत नाहीय की भगवान रामाच्या नावाला विरोध करावा की अटलजींच्या” असं लांबांनी म्हटलं आहे.
भाजपचं स्पष्टीकरण
आपच्या आरोपानंतर भाजपने पलटवार केला आहे. “आप खोटा प्रचार करत असून, भगवान राम आम्हा सर्वांसाठी आराध्य आहेत. त्यामुळे रामलीला मैदानाचं नाव बदलण्याचा प्रश्नच नाही”, असं दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटलं.