नवी दिल्ली : नुकत्याच गुडगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणाने देशभरात मोठी खळबळ माजली होती. या शाळेतील विद्यार्थी प्रद्युम्नच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातच आता मुजफ्फरनगरमधूनही अशीच घटना समोर आली आहे. मुजफ्फरनगरमधील शारडीन स्कूलमधील एका विद्यर्थ्याला शिक्षकाने लगावलेली कानशिलात जीवावर बेतली आहे. शिक्षकाने जोरदार कानिशिलात लगावल्यामुळे विद्यार्थ्याचा डोळा गेला आहे.


सफान असं या विद्यार्थ्याचं नाव असून, तो मुजफ्फरनगरमधील शारडीन स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकतो. एका लहानशा चुकीसाठी शिक्षकाने त्याला काशिलात लगावली. पण यात त्याचा डोळा निकामी झाल्याचा आरोप होत आहे.

सफनाची चूक इतकीच होती की, त्याने शिक्षकाची परवानगी घेतल्याशिवाय आपल्या मित्राच्या बाकाजवळ गेला. यानंतर शिक्षकाने सफानला जोरदार कानशिलात लगावली, यामुळे त्याचा एक डोळा निकामी झाला आहे.

या घटनेनंतर सफानच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन, आरोपी शिक्षक आणि शारडीन स्कूल विरोधात तक्रार दाखल केली आहे.

शारडीन स्कूलची मुजफ्फरपूरमधील नामांकीत शाळांमध्ये गणना होते. या शाळेत अनेक वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे विद्यार्थीही शिक्षण घेतात. त्यामुळे या शाळेतही विद्यार्थ्याबाबत अशी घटना घडल्याने, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी शारडीन स्कूलच्या वतीने कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.