लखनऊ : योगी सरकार हे मायावती यांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्याथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूर्ती ठेवल्या जाणार आहेत. या मोदी आणि योगी यांच्या मूर्ती अगदी खास पद्धतीने चित्रकूटच्या एका कलावंताने बनवल्या आहेत.


उत्तर प्रदेशात लोकसभा पोटनिवडणुकीतील दारुण पराभवानंतर योगी आदित्यनाथ यांनी भाजप कार्यालयांमध्ये मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

परवा म्हणजे 5 जून रोजी योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस साजरा केला गेला. त्यावेळी त्यांना भेट देण्यात आलेल्या दोन मूर्तींचीही जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातील एक मूर्ती उत्तर प्रदेशातील शक्तिशाली भाजप नेते म्हणून ओळख असलेल्या सुनील बन्सल यांनी दिली, तर दुसरी मूर्ती योगी आदित्यनाथ यांचे ओएसडी अभिषेक कौशिक यांनी दिली.



भगवे कपडे परिधान केलेली योगींची मूर्ती दस्तुरखुद्द योगी यांनासुद्धा प्रचंड आवडल्याचे समजते आहे. तिथे उपस्थित असलेल्या इतर नेत्यांनाही या मूर्तींची प्रचंड स्तुती केली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच आदेश जारी करण्यात आला की, उत्तर प्रदेशातील भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये योगी आणि मोदी यांच्या मूर्ती ठेवल्या जातील. उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये तर भाजपचे चार-चार-पाच-पाच कार्यलये आहेत.

केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर भाजपने उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचं कार्यालय बनवण्याचे आदेश दिले होते. सध्या उत्तर प्रदेशातील 75 पैकी 64 जिल्ह्यात भाजपचे कार्यलय आहे.

लोकसभा पोटनिवडणूक पराभूत झाल्यानंतर उत्तर प्रदेश भाजपमध्ये काही प्रमाणात नैराश्य आले असले, तरी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जोश निर्माण करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. कार्यालयांमध्ये मूर्ती ठेवण्याचा आदेशही याच रणनीतीचा भाग मानला जात आहे.

सूत्रांची माहिती अशी की, पक्षाच्या कार्यालयांमध्ये योगी आणि मोदींच्या मूर्ती ठेवण्याची कल्पना ओएसडी अभिषेक कौशिक यांचीच होती. अभाविपचे नेते राहिलेले कौशिक हे कधीकाळी सुनील बन्सल यांचे निकटवर्तीय होते. सध्या ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ओएसडी आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतही कौशिक यांनी काम केले आहे.