कार आणि घोड्याचा विचित्र अपघात, काच फोडून घोडा कारमध्ये घुसला
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2017 09:57 AM (IST)
जयपूर: राजस्थानातील जयपूरमध्ये काल एक विचित्र अपघात झाला. भरधाव कार आणि सुसाट सुटलेल्या घोड्याची समोरा समोर धडक झाली. हा अपघात इतका विचित्र होता की, घोडा थेट कारची काच तोडून आत घुसला. अर्धा आत आणि अर्धा बाहेर अशा अवघडलेल्या अवस्थेत घोडा कारमध्ये घुसला होता. जयपूरमध्ये एका टांगेवाल्यानं आपला घोडा रस्त्यावर दोरीनं बांधून ठेवला होता. तापमानाचा पारा 42 वर पोहचला होता. तळपत्या उन्हात हैराण झालेला हा घोडा दोरी तोडून धावत सुटला. यावेळी त्याच्या तोंडाला बांधलेली चाऱ्याची पिशवी डोळ्यावर आली. या पिशवीमुळे त्याला काहीच दिसेनासं झालं आणि तो आणखी चवताळला. समोर भरधाव वेगानं येणाऱ्या कारला तो धडकला आणि थेट काच फोडून आत शिरला. काच फुटल्यानं घोडा आणि कारचालक दोघेही जखमी झाले. उपचारानंतर घोडा शांत झाला.