वाराणसीः वाराणसीत बाबा जयगुरदेव यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 24 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत 70 भाविक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पीडितांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

अखिलेश यादव यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मोदींनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आवश्यक ती मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मोदींनी ट्विटरवरुन दिली आहे.

https://twitter.com/narendramodi/status/787237072411078656

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनेने दुःख झाल्याचं सांगितलं. संबंधित अधिकाऱ्यांना मदतीचे निर्देश दिले असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

https://twitter.com/rajnathsingh/status/787239574590193664

या घटनेमुळं वाराणसीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना घटनास्थळी येण्यासाठी विलंब होत आहे.

या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून केवळ 3 हजार भाविकांसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र कार्यक्रमासाठी 70 ते 80 हजार भाविक आले. त्यामुळे एकमेकांच्या पुढे जाण्याच्या चढाओढीत ही दुर्घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.