SSC Scam : पश्चिम बंगालमध्ये सध्या गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी धक्कादायक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. ईडीने आरोपी अर्पिता मुखर्जीकडून एक डायरी हस्तगत केली आहे. या डायरीत शिक्षक भरती घोटाळ्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ईडीने अर्पिताच्या घरावर छापा मारला होता. यावेळी सुमारे 21 कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. 


ईडी अधिकाऱ्यांनी अर्पिताच्या फ्लॅटमधून एक 40 पानी  ब्लॅक डायरी ताब्यात घेतली आहे. त्याशिवाय आणखी काही दस्ताऐवज, पॉकेट डायरी आणि दोन हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या आहेत. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे अनेकजण अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बंगालचे माजी कॅबिनेट मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली आहे. 


पार्थ चॅटर्जी अटक केल्यानंतर त्यांना प्रकृती अस्वास्थाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांनी एसएसकेएम रुग्णालयात उपचारासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, ईडीने केलेल्या विरोधानंतर पार्थ चॅटर्जी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. चॅटर्जी यांच्यावर बंगालऐवजी भुवनेश्वरमध्ये उपचार करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, त्यांना एसएसकेएम हॉस्पिटलमधून एअर अॅम्ब्युलन्सनं एम्स, भुवनेश्वर मध्ये दाखल करण्यात आले. ते व्हील चेअरवर आहेत. त्यांच्यासोबत रुग्णालयातील डॉक्टर आणि वकील आहेत. भुवनेश्वर एम्समध्ये पार्थ चॅटर्जीसाठी वैद्यकीय पथक तयार ठेवण्यात आले आहे. 


दरम्यान, पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी आणि टीएमसी (TMC) नेते पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीला कार्यालयात घेऊन जाणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) गाडीला एका कारनं धडक दिली. ईडीच्या गाडीत अर्पिता मुखर्जीसोबत ईडीचे अधिकारीही गाडीत होते. या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालेलं नसून सर्वजण सुरक्षित आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: