Who is Arpita Mukherjee : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती (West Bengal SSC Scam) घोटाळ्यामध्ये ममता बनर्जी यांच्या (Mamata Banerjee) सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी हिच्या घरातून तब्बल 20 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. अर्पिता मुखर्जी कोण आहे, हे जाणून घ्या.


अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 कोटींची रोकड जप्त


मंत्री पार्थ चटर्जी यांचे निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 22 जूलै रोजी तब्बल 20 कोटी रुपयांची रोकड ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली रोकड स्कूल सर्व्हिस कमिशन (SSC) घोटाळ्याशीसंबधित (West Bengal School Service Commission and West Bengal Primary Education Board) असल्याचा ईडीला संशय आहे. ईडीने 20 कोटींच्या रोकडसह 20 मोबाईल, कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही जप्त केल्या आहेत. शुक्रवारी ईडीने पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकली. 


20 कोटींची रोकड सापडलेली अर्पिता मुखर्जी कोण आहे? 



  • ईडीने पार्थ चॅटर्जीची यांची जवळची सहकारी असणाऱ्या अर्पिता मुखर्जीला अटक केली आहे.

  • अर्पिता एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 

  • अर्पिता मुखर्जीने बंगाली चित्रपटसृष्टीतील काही मोठ्या स्टार्ससोबतही काम केलं आहे. 

  • अर्पिता मुखर्जीने काही बंगाली, ओडिया आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • अर्पिताने अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी यांच्यासोबत 'मामा भगने' (Mama Bhagne) आणि अभिनेता जीतसोबत 'पार्टनर' या चित्रपटात काम केलं आहे.

  • अर्पिता 2019 आणि 2020 मध्ये नकतला उदयन संघ नावाच्या पार्थ चॅटर्जी यांच्या दुर्गा पूजा समितीच्या मोहिमेचा चेहरा होती.

  • पार्थ चॅटर्जी यांची समिती कोलकातामधील सर्वात मोठ्या दुर्गा पूजा समित्यांपैकी एक आहे. अर्पिता मुखर्जी दुर्गा पूजा समितीच्या माध्यमातून पार्थ चॅटर्जीशी जोडली गेल्याचं बोललं जातं आहे.


मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीकडून अटक


पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीनं अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चॅटर्जी यांनी चौकशी सुरु होती. चौकशी झाल्यानंतर त्यांना ईडीनं अटक केली आहे. तसेच ईडीने त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून करोडो रुपयांची रोकड आणि सोनं जप्त केलं आहे. 


काय आहे शिक्षक भरती घोटाळा?


पश्चिम बंगालच्या सरकारमधील एका मंत्र्यावर करण्यात येत असलेली कारवाई ही संपूर्ण शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरु झाली होती. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये लाखो रुपयांची लाच घेऊन नापास उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप देखील केला होता. तसेच यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या